
भर्रेगाव ठरला देवरी तालुक्यातील सुंदर गाव
Deori: गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणार्या स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत देवरी तालुक्यातून भर्रेगाव ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुका स्मार्ट ग्राम 2023-24 या वर्षाकरीता भर्रेगावची निवड झाली आहे. तेव्हा देवरी तालुक्यातून भर्रेगाव हे सुंदर गाव ठरले असून 10 लाख रुपयाचे पारीतोषिक मिळणार आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार शासनाच्या विविध योजनांची अमलबजावणी करून स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारीक उर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींवर गुणांकन देऊन जिल्हा व तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामपंचायतीची निवड करून आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार दिले जाते. ज्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात येत असून गावातील मुख्य रस्ते, शाळा, अंगणवाडी, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोंडवाडा, सार्वजनिक शौचालय, सभामंडप, व्यायाम शाळा, समाज मंदिर, स्मशानभूमी तसेच गावातील नियोजनबद्ध रस्ते, जिप आणि पंस यांच्यामार्फत राबविण्यात येणार्या सर्व योजना आदी बाबींच्या आधारे देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचातीची निवड करण्यात आली.
या अनुषंगाने नुकत्याच नवेगावबांध येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते भर्रेगाव ग्रामपंचायतीला आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये देवरीचे गटविकास अधिकारी जी. टी. सिंगनजुडे, सरपंच लखनलाल पंधरे, उपसरपंच जयेंद्र मेंढे, ग्रामपंचायत अधिकारी सी. आर. चाचरे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी जिप मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथन, पटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील, सांगली जिपचे श्रीधर कुलकर्णी, जिप उपाध्यक्ष सुरेश हर्षे, सभापती पोर्णिमा ढेंगे, रजनी कुंभरे, डॉ. लक्ष्मण भगत, दीपा चंद्रिकापुरे, पंस सभापती अनिल बिसेन आदी उपस्थित होते.
तालुक्यातील सुंदर गावाचे पोरितोषिक पटकावून भर्रेगाव ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायतीपुढे आदर्श निर्माण केला असून इतर ग्रामपंचायतीनही शासनाकडून राबविण्यात येणार्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत गावाचा विकास साधावा.
जी. टी. सिंगणजुडे
गटविकास अधिकारी, देवरी