
कौतुकास्पद! 936 आजी आजोबांनी दिली परीक्षा
तालुक्यातील 145 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली
देवरी : केंद्र शासनाच्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील 145 परीक्षा केंद्रात असाक्षर आजी आजोबाची यांची साक्षरता परीक्षा 23 मार्च 2025 रोजी घेण्यात आली. या परीक्षेत 936 आजी आजोबांनी सहभाग घेतला.
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील निरक्षर व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सन 2027 पर्यंत 100% नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट कार्यक्रमाचे आहे सादर कार्यक्रम 2022 ते 2027 या कालावधीत राबविण्यात येत आहे. वर्षातून दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यात येते . उल्लास पोर्टल वर नोंदीकृत असाक्षर यांची परीक्षा घेण्यात येते.
मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेकरिता देवरी तालुक्यातील एकूण 953 असाक्षर यांची उल्लास पोर्टल वर नोंदणी करण्यात आली होती पैकी 936 असाक्षर परीक्षेला बसलेत. असाक्षर आजी आजोबांना या वयात परीक्षा देतांना एक वेगळाच आंनद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
परीक्षेचे स्वरूप आणि उतीर्ण होण्याचे निकष
परीक्षा एकूण 150 गुणांची होती. वाचन लेखन आणि संख्याज्ञान या तीन विषयाच्या प्रत्येकी 50 गुणांच्या परीक्षेत प्रत्येक विषयात किमान 17 गुण मिळणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्र हे असाक्षर व्यक्तीचे नोंदणी करण्यात आलेल्या शाळाच ठेवण्यात आले होते. राज्य साक्षरता केंद पुणे यांच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली व सुरळीत पार पडली. तालुकास्तरावर सदर परीक्षेचे कार्य महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी यांच्या मार्गदर्शनात व डी टी कावळे गट समन्वयक यांच्या सहकार्याने उमेश भरणे तालुका कार्यक्रम समन्वयक यांनी पार पाडले.