जिल्ह्यात 65.09 टक्के मतदान , 64 उमेदवारांचे भवितव्य पेटी बंद
◼️मतांच्या बेरीज वजाबाकीचे समीकरण सुटेना? गटबाजी, आंतरिक कूटनीतीने समीकरण बिघडणार
प्रा. डॉ. सुजित टेटे, प्रहार टाईम्स
देवरी: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडले असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. यामधे आमगाव ६६ विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवार रिंगणात असून पुराम विरुद्ध पुराम अशी प्रत्यक्ष लढल बघावयास मिळाली. आमगाव विधानसभा क्षेत्रात निवडणुक शांततेत पार पडली असून आता येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 64 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले.
जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 67.31 टक्के, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 67.3 टक्के, तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.45 टक्के व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.32 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 65.09 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील आमगाव व अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत मतदान केले. गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी सकाळी 7 वाजेपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला.
गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 53 हजार 685 पुरुष मतदार आणि 5 लाख 71 हजार 405 स्त्री मतदार असून 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 हजार 724 अधिकारी-कर्मचारी मतदान पथकात कार्यरत होते. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पॉईंटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 10 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होती. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष ते पोलीस कर्मचारी देखील महिलाच होत्या.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85 वर्षावरील वयोवृध्द एकूण 481 मतदारांनी गृह मतदान केले, तर मतदान पथकात कार्यरत असलेले 6 हजार 450 अधिकारी-कर्मचारी यांनी पोस्टल बॅलेटद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
असे असले तरी लोकांचा चर्चा आणि बदलत्या समीकरणामुळे महायुती आणि महाआघाडी मधे अटा तटाची लढत बघावयास मिळणार आहे.मतांच्या बेरीज वजाबाकीमध्ये आपले समीकरण कसे जुळेल यामध्ये उमेदवार आणि सक्रिय कार्यकर्ते अडकलेले आहेत. एकी कडे गटबाजी , आंतरिक कूटनीती आणि क्रॉस वोटिंग ने सर्व राजकीय पक्षांचे समीकरण गोंधळात असून अनेक दिग्गज अनुभवी राजकारणाच्या चेहऱ्यावरचे पाणी उडालेले बघावयास मिळालेले आहे. असे असले तरी येणाऱ्या २३ नोव्हेबर ला निकाल लागताच ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ स्पष्ट होणार आहे.