जिल्हात तुरळक पाऊस, शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
गोंदिया◼️ तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. २ दिवसापासून ऊनसावलीचा खेळ सुरू होता. मध्यरात्रीनंतर शहर आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शेतकर्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 13.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अद्यापही अपेक्षीत पाऊस झाला नसल्याने प्रमुख धरणांमध्ये अल्पसाठा शिल्लक आहे.
पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या गोंदिया जिल्ह्यात अद्यापही अपेक्षीत पाऊस झाला नाही. जूनचा मध्यान्ह कोरडा गेला. 20 जूननंतरच जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले, तेही तुरळकच. जूनमध्ये 56 टक्के पाऊस कमी बरसला. जुलैचे 5 दिवस लोटत असताना पाहिजे तसा पाऊस बरसला नाही. जिल्ह्यात बुधवारपासून तुरळक सरी बरसत आहेत. आज सकाळी जिल्ह्यात 13.4 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आजपर्यंत 259.7 मिमी पाऊस अपेक्षीत असताना 167.4 मिमी म्हणजेच सरासरीच्या 65.4 मिमीच पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 239.3 मिमी म्हणजेच सरासरीच्या 92.1 मिमी पाऊस झाला होता. एकाही तालुक्यात पावसाने सरासरी गाठली नाही. गोंदिया तालुक्यात 60.7 टक्के, आमगाव 51, तिरोडा 58.5, गोरेगाव 62.9, सालेकसा 57.8, देवरी 84.7, अर्जुनी मोर 54.5 व सडक अर्जुनी तालुक्यात 48.7 टक्केच पाऊस झाला आहे.farmers- rain जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही अपेक्षीत पाऊस झाला नसल्याने धरणे तळ गाठताहेत. पावसाची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्याला जोरदार पावसाची पगतीक्षा आहे.
जिल्ह्यात यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये प्रमुख जलाशयांची पाणीपातळी खालावली. जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. धरण, तलाव, नदी आणि नाले अद्यापही प्रवाहित झाले नाही. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख सिंचन प्रकल्प तहानलेलेच आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर मान्सून कालावधीत सरासरी 1220 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होते. 2022 वर्ष वगळता दशकभरात पावसाने सरासरी गाठली नाही. आतापर्यंत अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील मुख्य जलाशयांमध्ये धापेवाडा प्रकल्पात 30.49 टक्के, इटियाडोह 23.64 कालीसराड मृतसाठा, पुजारीटोला 35.93 व शिरपूर प्रकल्पात 10.80 टक्के तर 9 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 27.34 टक्के, 23 लघू प्रकल्पात 14.58 व 38 मालगुजारी जलाशयात 21.25 टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या दिवसांत सरासरी पाऊस न झाल्यास शेतकर्यांसह जिल्हावासीयाची चिंता वाढवणार आहे.
जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान नर्सरींना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने सर्वाधिक क्षेत्रावर धानाची लागवड होते. तुर, तीळ, मका, भाजीपालासह इतर पिके घेतली जातात. 4831 हेक्टर क्षेत्रात यंदा आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत 2104 हेक्टर क्षेत्रात तूर लागवड झाली आहे. याशिवाय अन्य पिकांचीही लागवड सुरू आहे. धान रोवणी योग्य पाऊस झालेला नाही, सिंचन सोयी असलेले शेतकरी धान रोवणी करत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4.92 टक्के पेरणी झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी सांगितले.