रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी नयना गुंडे

नागरिकांनो वाहतूक नियमांचे पालन करा, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक

गोंदिया दि. 24: रस्ते अपघातांची व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही बाब निश्चितच गंभीर असून रस्ते सुरक्षेची व्याप्ती व अपघातामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केल्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद, कार्यकारी अभियंता एन. टी. लभाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बी. टी. वरतानी, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा महेश बनसोडे, मोटर वाहन निरीक्षक अतुल पवार, महामार्ग पोलीस प्रशांत भुते, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी एम. एस. निंबाळकर व विपीन पांडेय या बैठकीला उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण आठ ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघात प्रवण स्थळ असून जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 201 रस्ते अपघात झाले. या अपघातात 118 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 148 गंभीर जखमी झाले. यात सर्वाधिक 102 अपघात दुचाकी वाहनाचे आहेत. त्याखालोखाल 36 ट्रक 27 कारचे अपघात आहेत. मागील तीन वर्षाच्या तुलनेत अपघातातील मृत्यूची संख्या कमी असली तरी चिंताजनक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सन 2019 मध्ये 265अपघात 160 मृत्यू, सन 2020 मध्ये 218 अपघात 140 मृत्यू व सन 2021 मध्ये 252 अपघात 132 मृत्यू  झाल्याची  माहिती  उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी  राजवर्धन करपे यांनी  दिली.

          रस्ते अपघाताची आकडेवारी चिंताजनक असून अपघात कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्यासाठी सर्व रस्त्यांचा नव्याने सर्व्ह करण्यात यावा. रस्तावर सूचना फलक लावावे, रस्ते दुभाजकाचा आढावा घ्यावा, रस्ते वळणावरील झाडी – झुडपे हटवावे व खड्डे बुजविण्यात यावेत यासह कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बाब असून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शालेय बस, स्कुल व्हॅन, तीन चाकी रिक्षा इत्यादी वाहनातून आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विरुद्ध विशेष तपासणी मोहिम नियमितपणे राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. अपघात झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय सुविधा तातडीने मिळायला हवी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रुग्णवाहिका 108 सह तालुका आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तातडीच्या प्रसंगी उपलब्ध करून देण्यात याव्यात. रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. समिती सदस्यांनी सुद्धा याबाबत आपल्या सूचना व निरीक्षण समितीला वेळोवेळी कळवावे. आपला जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Share