गोंदियातील पोलिस कर्मचार्‍यांना मिळणार पूर्वीप्रमाणे दीडपट पगार

गोंदिया : नक्षलग्रस्त व संवेदनशील क्षेत्रात काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना दिला जाणारा दीडपट पगार व महागाई भत्ता महाविकास आघाडी सरकारच्या काळात एप्रिल 2021 मध्ये बंद केला होता. यासंदर्भात आ. डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांना दीडपट पगार व महागाई भत्ता पूर्ववत करण्यात आला आहे. तसे आदेश 3 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले आहे.नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात जीव धोक्यात घालणार्‍या पोलिस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचार्‍यांना 2011 पासून नक्षलविरोधी अभियानासाठी दीडपट पगार व महागाई दिला जात होता.

मात्र, महाविकास आघाडी सरकारने एप्रिल 2021 पासून दीडपट पगार बंद करुन त्यांचे मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात आ. डॉ. परिणय फुके यांनी 24 सप्टेंबर 2022 रोजी नक्षलग्रस्त अशा संवेदनशील गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांच्या या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानात सहभागी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पूर्वीप्रमाणे दीडपट पगार व महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना सहानुभूती दाखवत पगारात दीड पटीने वाढ करून महागाई भत्ता देण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश प्राप्त होताच, गृह विभागाने तसा शासन निर्णय जारी केला. ज्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्यात आली. पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ.परिणय फुके यांचे आभार व्यक्त करत पगार व महागाई भत्त्यात दीडपट वाढीचा आदेश मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

Print Friendly, PDF & Email
Share