खतांचे भाव गगनाला ८५० रुपयांची खताची बॅग १४०० रुपयांवर !
गोंदिया : कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्याच्या भावात रोजघडीला मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. शेतीत लागणारा मुख्य घटक म्हणजे रासायनिक खत. त्यांच्या किमतीत मागील दहा वर्षांत ५५० रुपयांनी वाढ झाली आहे.
शेतीमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पिके घ्यायची म्हटले तर रासायनिक खताशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. खताच्या किमती कितीही गगनाल्या भिडल्या तरी उसनवारी पैसे उचलून खते घ्यावीच लागतात. मागील दहा वर्षांच्या काळात खताची ‘डीएपी’ची बॅग ८५० वरून १४०० रुपयांवर येऊन ठेपली आहे. पिकांचे भाव सातत्याने घसरतच आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरताना दिसत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आता समोरील काळात शेती करायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.
खतांचे भाव ज्याप्रमाणे वाढत आहेत, त्याच टक्केवारीनुसार शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव जर वाढला असता, तर आज एकही शेतकरी कर्जबाजारी राहिला नसता. परंतु, सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, हे देखील जळजळीत वास्तव आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल निघायला लागला की, बाहेरून माल आयात केला जातो. आयात-निर्यातीचे धोरण आजपर्यंत संपूर्णपणे शेतकरीविरोधात राबविले गेले आहे, असे समस्त शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.