देवरी :रस्ता अपघात टाळण्यासाठी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने महामार्ग पोलिसांनी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला महामार्ग पोलीस निरीक्षक एपीआय राजू बस्तावडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, महामार्ग पोलिसांची टीम उपस्थित होती.
कार्यक्रमात एपीआय राजू बस्तावडे यांनी वाहन चालविताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, मोबाईलचा वापर टाळणे, वाहतूक नियमांचे पालन, वेग मर्यादा पाळणे तसेच रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रस्ता अपघातांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदार व शिस्तबद्ध वर्तन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी एपीआय राजू बस्तावडे यांचे आभार मानले. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम पुढेही राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








