गोंदिया जिल्ह्यातील ३५० तलावात होणार ‘वॉटर बँक’

गोंदिया:  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गाळमुक्त धरण -गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या माध्यमातून तलावातील पाणी पातळी वाढावी यासाठी तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगानेगोंदिया जिल्ह्यातील ३४६ तलावातील गाळ काढून त्या तलावांमध्ये ‘वॉटर बँक’ तयार केली जाणार आहे. ज्यामुळे तलावाच्या जलस्तरात वाढ होणार असून उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईवरही मात करता येणार आहे.

तलावाचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात पाठबंधारे विभागाच्या मोठ्या धरणांसह मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, जुने मालगुजारी तलाव असतानाच जिल्हा परिषदेच्या अ‘त्यारीतील दिड हजाराच्या जवळपास मामा तलाव आहेत. जिल्ह्यातील प्रत्येकच गावात २ ते ३ तलाव असून या तलावांमुळे जिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसत नव्हती. मात्र, गेल्या १० ते १५ वर्षांपासून या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक तलाव सपाट झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः एप्रिल महिन्यातच अनेक तलाव कोरडे पडतात. परीणामी आता जिल्ह्यातही पाणीटंचाई निर्माण होताना दिसते. दरम्यान, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अशा तलावातील गाळ काढली जाणार असून तलावांचे खोलीकरणही करण्यात येणार आहे. यात विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ३४६ तलावांचा यंदा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही या तलावांमध्ये पाणी उपलब्ध राहणार असून भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येणार आहे. 

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संबंधित विभागाला अपेक्षित अशी कामे करता आली नसल्याचे आढळनू आले असून जिल्ह्यात एकूण १३१ मंजूर कामातून ११ लाख ३० हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, यातून केवळ ४९ कामातून २ लाख ४३ हजार घनमीटर गाळ काढण्यात आले असल्याची माहिती आहे. ज्याची टक्केवारी ३८ टक्के आहे.

अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३४६ तलावातील गाळ काढण्यात येणार असून यात गोंदिया तालुक्यातील ३९ तलावांसह गोरेगाव तालुक्यातील ५१, देवरी ३३, आमगाव ३२, सडक अर्जुनी २८, सालेकसा ५३, अर्जुनी मोरगाव ५६ व तिरोडा तालुक्यातील ५४ तलावांचा समावेश आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें