भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त देवरी येथे ध्वजारोहणासह भव्य संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम

देवरी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता देवरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भव्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने शिस्तबद्ध संचलन सादर करण्यात आले. संचलनाने उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली. यानंतर विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर करून शिस्त, एकजूट व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला.

या कार्यक्रमास नवनाथ कातकडे (तहसीलदार, देवरी), प्रेमदास नामूर्ते , रवींद्र आंधळे , सविता एस. मडावी , धीरज पुरी आदी नायब तहसीलदार तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व , संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांची जपणूक करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तरुण पिढीने राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें