निराधारांची दिवाळी होणार गोड
गोंदिया : निधीअभावी अनुदानापासून वंचित राहिलेल्याा गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील निराधारांना दिवाळीपूर्वीच (Diwali) भेट मिळणार आहे. संजय गांधी योजनेअंतर्गत येणार्या योजनांचे व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 1819 कोटींचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वर्ग केला आहे. उद्या सोमवारपासूून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे.
निराधारांचा थकीत अनुदान देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कोरोनाच्या संक्रमणामुळे अर्थकारणाची घडी विस्कटली होती. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थकारण सुधारू लागल्याने थकीत अनुदान योजना मार्गी लावण्यास शिंदे-फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात 15 हजारपेक्षा अधिक लाभार्थी असून मागील 4 महिन्यापासून त्यांचे अनुदान थकल्याचे लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधींकडे निराधार व काही संघटनांनी निवेदन देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदारांनी निराधार योजनेच्या अनुदानाचा विषय लावून धरल्यानंतर 1320 कोटी रुपये मंजूर केले होते. यातील संजय गांधी निराधार योजनेसाठी एप्रिल 2022 ते मार्च 2023 चा कालावधीत वितरित करण्यासाठी 625 कोटी रुपये तर श्रावणबाळ योजनेसाठी 1194 कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला आहे.
यांची दिवाळी (Diwali) होणार गोड
18 ते 65 वर्षांखालील निराधार, क्षयरोगी, कुष्ठरोगी, तृतीयपंथी, देवदासी, परित्यक्ता, 35 वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षेत असलेल्या कैद्याची पत्नी यांनाही लाभ होणार आहे.