शिंदे गटाच्या 31 आमदारांना “Y” दर्जाची सुरक्षा; जनतेच्या खिशातून करोडोंचा खर्च
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड करून भाजपसोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. पक्षात बंड केल्यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या जीवाला धोका होता म्हणून त्यातील जवळपास 31 आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली.
मात्र आता सत्तांतर होऊन 100 दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही गटाचे आमदार एकमेकांसोबत फिरताहेत, हसून-खेळून राहत आहेत. त्यांच्या सुरक्षेमुळे पोलिस दलावरील ताण वाढण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेचा खर्च जनतेच्या खिशातील पैशांतून केला जातोय. त्यामुळे यांची सुरक्षा काढण्याची मागणी आता सर्वसामान्यांतून होत आहे. मंत्रिपद नसले तरी वाय सुरक्षा असल्यामुळे राज्यमंत्रीपद असल्याचा फिल येतो अशी चर्चा आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये 11 सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यात दोन कमांडोज, दोन पीएसओ असतात. एका आमदाराच्या सुरक्षेचा सरासरी खर्च महिन्याकाठी 10 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे 31 आमदारांवर सुरक्षेसाठी करोडोंचा खर्च नाहक केला जात असल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या 31 आमदारांच्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणतात की, सुरक्षा घेऊन फिरणारे हे वाघ कसले? तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आमदारांच्या या सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली आहे.