चाळीस हजार घेताना मुख्याधिकारी जाळ्यात, कळमनुरीतील उमेश कोठीकरसह 3 पकडले
मुंबई- कळमनुरी येथील सिमेंट रस्त्याचे देयक काढण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांमार्फत ४० हजार रुपयाची लाच घेणाऱ्या मुख्याधिकाऱ्यासह तिघांना हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (१५ जुलै) दुपारी रंगेहाथ पकडले. उमेश कोठीकर असे मुख्याधिकाऱ्याचे तर लेखापाल राहुल जाधव, वरिष्ठ लिपिक मोहंमद झाकीर हुसेन अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
कळमनुरी शहरामध्ये पालिकेतर्फे एका कंत्राटदाराने सिमेंट रस्त्याचे काम केले होते. या सिमेंट रस्त्याची आठ लाख रुपयांची देयक झाले होते. हे देयक काढण्याबाबत तंत्र दराने पालिकेचे मुख्याधिकारी कोठीकर यांना वारंवार विनंती केली. मात्र त्यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम आज देण्याचे ठरले होते. या प्रकरणात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरून उपअधीक्षक निलेश सुरडकर, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे यांच्या पथकाने सपळा रचला. दरम्यान दुपारी दोन कर्मचाऱ्यांनी रक्कम घेऊन कोठीकर यांना दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने कोठीकर यांच्याकडून रक्कम जप्त केली आहे.