शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार

गोंदिया: विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील इयत्तेतील महत्वाच्या क्षमतांवर आधारित 30 दिवसांचा सेतू शाळांमध्ये शिकवला जाणार आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 च्या अहवालामध्ये भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचं समोर आलंय. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य स्तरावर नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विषय निहाय आणि इयत्तानिहाय तयार करण्यात आला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर हा अभ्यासक्रम आधारित असणार आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता, यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पर्ण करण्याच्या सचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर थेट पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा यापूर्वी झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे.

इयत्ता, विषयनिहाय स्वतंत्र ब्रिज कोर्स पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या अध्ययन निष्पत्ती व संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल. ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवता येणार आहे. हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत. सेतू अभ्यासक्रम 30 दिवसांचा असून शालेय कामकाजाच्या दिवसातच हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या संदर्भात शिक्षक व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी सूचना दिल्या जाणार आहेत. सेतू अभ्यासक्रमात विद्यार्थी विषयनिहाय कृतीपत्रिका म्हणजेच वर्कशीट प्रत्येक दिवशी सोडवतील असे नियोजन केले आहे.

ब्रिज कोर्स असा असेल 

ब्रिज कोर्स हा मागील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत, पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही. अशा बाबींचा समावेश कोर्समध्ये करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share