साहेब विहीर बांधकामाचे पैसे केव्हा देणार आता तरी सांगा ? शेतकऱ्यांचा सवाल
गोंदिया: जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून मंजूर असलेल्या धडक सिंचन विहिरीचे काम शासनाकडून थांबविण्यात आले होते. आता वर्ष 2021- 22 यावर्षी पुन्हा कार्यारंभ आदेश देऊन बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे शेतकर्यांनी विहिरीच्या बांधकामाला सुरुवात केली व विहिरीचे बांधकाम पूर्ण करून त्यात नियमाप्रमाणे बोरवेलचे खोदकाम केले. विहिरीच्या बांधकामाचा लाभ मिळण्यासाठी सातबारा उतारा आणि लाभार्थ्यांचा विहीर खोदकामाचा फोटो जलसिंचन विभागाला देण्यात आले. परंतु दोन महिन्याचा कालावधी होऊनसुद्धा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात अजूनही बांधकामाचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे मायबाप सरकार विहीर बांधकामाचे पैसे केव्हा देणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शासनाची धडक सिंचन योजना दीड एकर पेक्षा अधिक शेतजमीन असणार्या सर्व प्रवर्गाच्या शेतकर्यांसाठी खुली आहे. यातंर्गत जिल्ह्यात 2021-22 यावर्षाकरिता मंजूर 11000 विहिरींच्या लक्षांकांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त होऊन या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कार्यारंभ आदेश जानेवारी महिन्यात शेतकर्यांना देण्यात आला. त्यामध्ये तात्काळ 15 दिवसाच्या आत विहिरीचे बांधकाम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने शेतकर्यांनी विहिरीच्या बांधकामाला सुरुवात केली. मात्र आजघडीला सिमेंट, लोखंड, रेती व मजूर पुरवठा हे महागल्या असल्यामुळे 2.50 लाखाच्या या योजनेत शेतकर्यांचा विहिरीचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने लाभार्थ्यांनी उधारउसणवार करुन स्वतःचा पैसा लावून विहिरीचे काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे शासनाकडूनही वेळेवर निधी मिळेल अशी आशा शेतकर्यांना असते. मात्र विहिरीचे बांधकाम पूर्ण व नियमानुसार कागदपत्रे जमा करुनही मागील दोन महिन्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा झालेला नाही. यासंदर्भात चौकशी केली असता शासनाकडून फंड उपलब्ध नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे. अशात शेतकर्यांची होरफळ होत असून बांधकामासाठी उधार घेतलेले पैसे कसे फेडायचे? हा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांने शेतकर्यांच्या पूर्णत्वास आलेल्या विहिरींचा पैसा तत्काळ त्यांच्या खात्यात टाकावे, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.