7 वर्षात केवळ 31 पीडितांची तक्रार, संबंधित विभागाच महिलांच्या संरक्षणासाठी कुचकामी
गोंदिया: पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ व त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी शासकीय यंत्रणेकडून महिला लोकशाही दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जिल्ह्यात हा निर्णय नावापुरताच ठरत असल्याचे चित्र आहे. मागील 7 वर्षांत जिल्ह्यात फक्त 31 पीडित महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला राबविणार्या संबंधित विभागाच महिलांच्या संरक्षणासाठी कुचकामी ठरत असल्याचा रोष व्यक्त होत आहे.
पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एका हक्काचे व्यासपीठ राहावे, तसेच त्यांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी महिलांच्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी महिला लोकशाही दिन Women’s Democracy Day साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानुसार महिला लोकशाही दिनाचे कार्यक्रम तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तर जिल्हास्तरावर तिसर्या सोमवारी आयोजित करण्याच्या सुचना करण्यात आल्या. महिला व बालकल्याण विभागासह जिल्हा प्रशासनाला या बाबीची अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र गोंदिया जिल्ह्यात हा कार्यक्रम शासकीय यंत्रणेच्या दरबारापुरता ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील 7 वर्षात जिल्हास्तरावर 27 तर तालुकास्तरावर फक्त 4 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परिणामी प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पीडितांना न्याय मिळत नसल्याचा रोषही व्यक्त केला जात आहे.