जागतिक तंबाखूविरोधी दिन ; बापरे! गुटख्यापेक्षाही खर्रा घातक
अमेरिकन प्रयोगशाळेतील निष्कर्षाने डॉक्टरही चक्रावले
नागपूर : १० वर्षापूर्वीपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पॅकेटबंद गुटख्यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण देणारे घटक मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुटख्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. त्याची कडक अंमलबजावणीही झाली. पण गुटख्याला पर्याय म्हणून पुढे आलेला खर्रा (मावा) तर त्याचाही बाप निघाला. सुगंधित तंबाखू आणि चुना टाकून बनविलेला हा खर्रा गुटख्यापेक्षाही घातक असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील मिनेसोटाच्या प्रयोगशाळेने काढला आहे. खर्रा खाण्याचे प्रमाण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
त्यातही विदर्भात आणि गडचिरोली जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात मुख कर्करुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि गडचिरोली येथील ‘सर्च’ संस्थेच्या संयुक्त अहवालात राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी बरेच रुग्ण हे गडचिरोली जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले होते. वास्तविक राज्यात सुगंधित तंबाखूलाही बंदी आहे. पण खर्ऱ्यासाठी सर्रासपणे त्याचा वापर होत आहे. गुटख्यापेक्षा खर्रा कमी हानिकारक असल्याच्या गैरसमजातून लोकांमध्ये खर्रा सेवनाचे प्रमाण वाढले आहे. पण हा खर्राच आता युवा पिढीसह सर्वांच्या जीवावर उठला आहे.
काय आढळले अमेरिकेतील प्रयोगशाळेला?
मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे गडचिरोली जिल्हा तंबाखू सल्लागार डॉ. नंदू मेश्राम यांनी पुढाकार घेत खर्रा संशोधनासाठी पाठवला. अमेरिकेतील मिनेसोटा येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्टेपानोव्ह प्रयोगशाळेने केलेल्या संशोधनात गडचिरोलीच्या खर्ऱ्याची तुलना भारतात प्रचलित इतर धूरविरहित तंबाखूच्या पदार्थांशी केली आहे. त्यात खर्ऱ्यामध्ये नायट्रोसामाइन्सचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढलेला आढळून आला. यामुळेच तंबाखूशी निगडित मौखिक व घशाचा कर्करोग होतो. खर्ऱ्यात मुक्त निकोटीन जास्त प्रमाणात आढळून आले, ज्यामुळे जास्त नशा येऊन व्यक्ती व्यसनाधिन होतो. तसेच चुन्याच्या वापरामुळे खर्ऱ्याचा ‘पीएच’ गुटख्यापेक्षा जास्त आढळला आहे.
शासनाला उचलावे लागणार कडक पाऊल
मुख आणि घशाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरत असलेल्या ‘खर्रा बंदी’साठी आता राज्य शासनाला प्रभावी धोरणे आखावी लागणार आहेत. गुटखा बंदीच्या यशस्वी अंमलबजावणीप्रमाणे खर्रा बंदीची कडक अंमलबजावणी करून दुष्परिणामांबाबत जनजागृती केली तरच पुढील पिढीला वाचविणे शक्य होईल, अशी भावना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा तंबाखू सल्लागार डॉ. नंदू मेश्राम यांनी व्यक्त केली.