पहिलीच्या प्रवेशासाठी शाळापूर्व तयारी अभियान

गोंदिया 29: कोविड संसर्गाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील. यासाठी मार्च ते मे/जून दरम्यान, शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान राज्य शासन व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी शाळा आणि स्वयंसेवक यांची मुख्य भूमिका असेल. अभियानातंर्गत पहिलीमध्ये दाखल होणार्‍या बालकांसाठी प्रथम मेळावा हा दि. 31 मार्च पूर्वी होणार आहे व दुसरा मेळावा हा शाळा सुरू होणेपूर्वी जून महिन्यात होणार आहे.

या मेळाव्यात नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास, गणितपूर्व तयारीची माहिती घेऊन मातापालकांना मुलांची शाळापूर्व तयारी घरच्या घरीच कशी करावी याचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना एक पुस्तक शाळेतले पहिले पाऊल भेट देण्यात येणार आहे. या पुस्तकाच्या साहाय्याने माता/पालक आपल्या मुलाची पूर्वतयारी करून घेणार आहे. या पूर्वतयारीसाठी माता पालकांच्या गटांची बैठक घेऊन आयडिया कार्डच्या माध्यमातून मातांना आपल्या मुलांची पूर्वतयारी कशी करावी याची आयडिया मिळेल. असे 12 आठवड्याचे 12 आयडिया कार्ड मिळणार आहेत. त्यासाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करणार आहेत. शाळास्तरावर मेळावा आयोजनासाठी गावातील तरुण शिक्षणप्रेमी युवक-युवती, शाळेचे माजी विद्यार्थी, एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे भाऊ किंवा बहीण, डी. एड./बी. एड. झालेले तरुण हे स्वयंसेवक होऊ शकतात. त्यांना मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदविल्याचे शासनाचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार व सत्कार केला जाणार आहे.

या उपक्रमात विद्यार्थीनिहाय 12 आठवड्याचे 12 वर्कशीट मिळणार आहेत. ज्या मध्ये रंगकाम, चित्र काढणे, बिंदू जोडणे, चित्र ओळख, कागद चिकटकाम, जोड्या लावणे, चित्र मोजून अंक लिहणे, पाहुणा ओळखणे, आकारांची जोडी लावणे, शरीराचे अवयव व त्यांची नावे यांच्या जोड्या लावणे, लहान मोठ्या चित्रावर गोल करणे इत्यादी कृती बालकांकडून करून घेण्यात येतील. या साहित्याचा वापर करून 10 ते 12 आठवडे दाखलपात्र मुलांची शाळापूर्व तयारी करून घेतली जाईल व पुन्हा शाळा सुरू होण्यापूर्वी दुसरा मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या पुन्हा क्षमता पडताळणी करण्यात येतील. यातून मुलाची शैक्षणिक तयार झाल्याचे दिसून येईल व प्रवेशासह त्याच्या पुढील शैक्षणिक पाया मजबूत होण्यास मदत मिळेल.

Share