जिल्ह्यात शाळापूर्व तयारी अभियानाचे केंद्रस्तर प्रशिक्षण दि. 24 मार्चपासून

◾️31 मार्च पूर्वी होणार शाळा स्तरावर शाळापूर्व तयारी मेळावे….

गोंदिया 23 : सत्र 2022-23 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी राज्य शासनाने शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यात शाळा स्तरावर प्रत्येक जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व जिल्हा परिषद गोंदिया च्या सनियंत्रणात आज दि. 24 पासून एक दिवशीय केंद्रस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच 89 केंद्र व केंद्रप्रमुख सज्ज झाल्याची माहिती शाळापूर्व तयारी अभियानाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा डायट गोंदिया च्या अधिव्याख्याता योगेश्वरी नाडे यांनी सांगितले आहे.

सदरच्या प्रशिक्षणासाठी नुकतेच तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक समूह साधन केंद्रातून दोन तज्ञ शिक्षकांना तयार करण्यात आले असून ते सुलभक म्हणून केंद्रस्तरावर केंद्रातील सर्व 1 ते 5 च्या शिक्षकांना व अंगणवाडी सेविकांना शाळास्तरावर विद्यार्थ्यांचे मेळावे कसे आयोजित करावे या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्या करिता जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, गट समन्वयक, तालुक्यातील सुलभक साधनव्यक्ती,  केंद्रप्रमुख व केंद्रावरील सुलभक यांची तालुकानिहाय ऑनलाईन नियोजन सभा जिल्हा नोडल अधिकारी योगेश्वरी नाडे यांनी आज दिवसभर घेतली व मार्गदर्शन केले. काही तालुक्यांच्या सभेला डायट संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांनी देखील उपस्थित राहून आवश्यक त्या प्रशासकीय सूचना दिल्या व योग्य ते मार्गदर्शन केले.

सदर ऑनलाईन सभेचे आयोजन तालुकास्तरीय साधनव्यक्ती सुलभक यांनी केले होते. सर्व शिक्षकांनी प्रशिक्षणाला पूर्णवेळ उपस्थित राहून मेळाव्याचे स्वरूप समजून घ्यावे व शाळा स्तरावर होणारे शाळापूर्व तयारी मेळावे यशस्वी करावे असे आवाहन डायट गोंदिया व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया कडून करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share