1300 शेतकऱ्यांचे बँक खाते चुकिचे नोंदविल्याने 9 कोटी डीएमओंच्या खात्यात परत

गोंदिया 16: आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केंद्र संचालक व कार्यरत कर्मचार्‍यांची चूक धान विक्रेता शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बेतत आहे. 1300 शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक व नाव चुकीचे नोंदले गेल्याने तब्बल 9 कोटी रुपयांची धान विक्रीची रक्कम जिल्हा पणन कार्यालयाच्या खात्यात जमा झाली आहे. दुसरीकडे शेतकरी रकमेसाठी केंद्र व बँकांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात जिल्हा पणन कार्यालयाच्या उपअभिकर्ता संस्थांच्या माध्यमातून आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केली जाते. जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार 332 शेतकर्‍यांनी 107 केंद्रावर 35 लाख 57 हजार 160 क्विंटल धान विक्री केली. धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया आभासी पद्धतीने राबविली जाते. शेतकर्‍यांनी केंद्रावर विक्री केलेल्या धानाची रक्कमही आभासी पद्धतीने शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. तत्पूर्वी संबंधित केंद्रावर शेतकर्‍यांना बँक खाते पुस्तक, आधार कार्ड, सातबारा अभिलेख व अन्य कागदपत्रांची सत्यप्रत द्यावी लागते. केंद्रावर कार्यरत कर्मचारी आभासी प्रणालीत शेतकर्‍यांचे नाव, खाते क्रमांक नोंदणी करतात. मात्र 1300 शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक, नाव चुकीचे नोंदल्याने धान विक्रीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न होता तब्बल 9 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा पणन अधिकारी यांच्या खात्यात परत गेली आहे.

उल्लेखनीय म्हणजे महिन्याभरापूर्वी संबंधित केंद्र संचालकांना शेतकर्‍यांचे नाव व खाते क्रमांक दुरुस्ती करण्याची सूचना देण्यात आली होती. शासनानेही संबंधित वेबपोर्टल खुले केले होते. केंद्र संचालक व केंद्रावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही शेतकर्‍यांचे नाव व बँक खाते क्रमांक चुकीचे नोंदले गेले. त्यामुळे धानाची रक्कम जमा झाली नाही. तांत्रिक बाबी तपासून त्या दुरुस्त करून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी सांगितले.

Share