गोळी झाडून अस्वलाची शिकार
अर्जुनी मोर 15: जिल्ह्यातील वन क्षेत्रातील वन्यप्राणी पुन्हा एकदा शिकारींच्या निशाण्यावर आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत बाराभाटी सह वनीकरण क्षेत्रातील चान्ना बीट अंतर्गत इंजोरी गावात अस्वलाची गोळी झाडून शिकार करून अवयव गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने पुन्हा गोंदिया जिल्ह्यात वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी सक्रीय असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभली आहे या वनांमध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी वास्तव्यास आहेत. घनदाट जंगलाने वेढलेल्या जंगल परिसरात वन्यप्राणी सहजासहजी विचरण करताना दिसतात. मात्र आता त्यांच्या शिकाऱ्यांची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. गत काळात वाघ, बिबट, काळवीट, हरिण, मोर आदी वन्य पशुपक्ष्यांच्या शिकारीची प्रकरणे उजेडात आली आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंझोरी येथील शेतकरी हेमराज धनीराम शेंडे यांच्या गट क्रमांक 174 शेतामध्ये अस्वलाचे शव विकृत अवस्थेत सापडले. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या वन अधिकार्यांना अस्वलाचे पोट छाटलेले, पंजे आणि चामडेही कापलेले आणि महत्त्वाचे भाग गायब असल्याचे आढळून आले. काही अज्ञात शिकारींनी अस्वलाला गोळ्या घालून ठार करून मृतदेहाचे अवयव काढून शेतात फेकले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. अर्जुनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. वाघाये, पशुधन विकास अधिकारी डॉ. शीतल वानखेडे यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता अस्वलाला गोळी लागल्याची खात्री झाली. अस्वलाच्या शरीरातून एक गोळीही काढण्यात आली. घटनास्थळावरून अस्वलाचे विकृत शरीर व पंजा सापडला असून, आतील सर्व अवशेष गायब असून अस्वलाचे मांस विकल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहेे. या प्रकरणी अज्ञात शिकार्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ४४, ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिकारींचा शोध घेण्यासाठी आता डॉग स्कॉटची मदत घेतली जात आहे. पुढील तपास नवेगावबांधचे सहायक वनसंरक्षक डी. व्ही. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी आर. आय. दोनोडे करीत आहेत.