गोंदिया जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रात चौपट वाढ
गोंदिया: जिल्हा शिक्षण विभागाने जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांची जोरदार तयारी सुरु केली असून, कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा परीक्षा केंद्रांमध्ये तब्बल चौपट वाढ करण्यात आली आहे. एका परीक्षा केंद्राअंतर्गत काही शाळा उपकेंद्र म्हणून घोषित करण्यात आले असून दहावीची परीक्षा 297 केंद्रांवर तर बारावीची परीक्षा 222 केंद्रांवर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
कोरोना विषाणूमुळे सलग दोन वर्षे आभासी परीक्षा घेतल्या जात असून, यंदा परीक्षा आभासी होणार की प्रत्यक्ष असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने स्पष्ट केल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने परीक्षांची जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या ‘शाळा तिथे परिक्षा केंद्र’ या धोरणाप्रमाणे परीक्षा घेतल्या जाणार असून, परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत दहावीच्या परीक्षेसाठी 100 केंद्रे होती. ती आता वाढवून 297 एवढी करण्यात आली आहेत. तर बारावीसाठी आतापर्यंत जिल्ह्यात 74 परीक्षा केंद्रे होती. ती आता 222 झाली आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीर विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी या परीक्षा केंद्रांचा वापर होणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. बारावीची परीक्षा 4 ते 30 मार्चपर्यंत तर दहावीची परीक्षा 15 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत होणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 21 हजार 71 तर बारावीच्या परीक्षेसाठी 19 हजार 122 विद्यार्थी बसणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोरोनामुळे शाळा तेथे परीक्षा केंद्र असणार आहे. शाळेतील शिक्षकच पर्यवेक्षक असतील आणि शेजारील शाळेतील शिक्षक तेथील परीक्षेवर नजर ठेवतील. विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी. परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हाव्यात, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रदीप समरीत यांनी सांगितले.
फिरते पथक यंदा नाहीच
परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना काही परिक्षार्थी गैरप्रकार करतात. परीक्षा पारदर्शक व्हावी, कोणीही कॉपी करू नये म्हणून बोर्डाकडून स्कॉड तथा फिरत्या पथकांची नियुक्ती केली जाते. मात्र, कोरोनामुळे यंदा तसे काही होणार नसून शेजारील शाळेतील शिक्षकच परीक्षा होईपर्यंत त्याठिकाणी बैठे स्कॉड म्हणून नेमले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करून लिहून स्वतःची फसवणूक करू नये, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.