किराणा दुकानात मोहफुल दारु विक्रीला परवानगी द्या

गोंदिया: राज्य मंत्रीमंडळाने फलोत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी किराणा दुकान व सुपरबाजारात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर मोहफुलावर उदरनिर्वाह करणार्‍या मजुरांच्या हितासाठी मोहफुल दारु सुपरमार्केट व किराणा दुकानात विक्रीस परवानगी द्या, अशी मागणी सडक अर्जुनीचे माजी उपसभापती राजेश कठाणे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र 28 जानेवारी रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

पत्रानुसार, फळ उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासासाठी राज्य मंत्रीमंडळाने फळापासून तयार होणार्‍या वाईन सुपरमार्केट व किराणा दुकानात विकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे फळ उत्पादक शेतकर्‍यांचा विकास साधला जाणार आहे. पूर्व विदर्भात मोहफुल संकलन व विक्रीतून हजारो कुटूंबीयांचा उदरनिर्वाह होतो. मोहफुल औषधीयुक्त असून त्यापासून दारु देखील तयार केली जाते. ही दारु सुपरमार्केट व किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यास मोहफुल संकलन करणार्‍या हजारो कुटूंबीयांचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयातंर्गत मोहफुल दारु सुपरमार्केट व किराणा दुकानातून विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कठाणे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share