श्रीमती के.एस.जैन विद्यालयात बालिका दिन साजरा
देवरी 03- स्थानिक श्रीमती के.एस.जैन विद्यालयात शाळेतील प्राचार्या श्रीमती रझिया शेख यांचे मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थीनींच्या पुढाकाराने बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींचे स्थान शाळेतील विद्यार्थीनींनीच भुषवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. आचल उईके तर प्रमुख अतिथीच्या स्थानी कु. स्नेहा पंधरे, कु. हिमांशी शहारे आणि कु. टिना भोयर यांची उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले . अनेक विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. त्याचप्रमाणे याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अनेक विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांची केलेली वेशभूषा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कु. सलोनी गौतम तर आभारप्रदर्शन कु. धारा सोनुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती डी.के. मेश्राम यांनी सहकार्य केले.