कोरचीत पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक:26 नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज

गडचिरोली: कोरची तालुक्यातील कोटगुल पोलिस मदत केंद्रांतर्गत रानकट्टा जंगल परिसरातील चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाल्याची चर्चा आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये कोरपर्शीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी आहेत.

गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपुरला हलवण्यत आले आहे. आज कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र यामध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याचा देखील समावेश असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

जवानांकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणास जवानांनी वेढा दिलेला आहे. तर या कारवाईत मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली गेली आहे.

Share