गांजा तस्करी: कोका अभयारण्यातुन दोन आरोपींना अटक
भंडारा:जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यात गस्ती दरम्यान काही इसम मोटारसायकलने गांजाची तस्करी करताना आढळून आले. चौकशीअंती दोन तस्करांना पकडून लाखनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. कोका वन्यजीव अभयारण्यातील ए.एन. पवार हे 18 रोजी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास गांगलवाळा बिटमध्ये गस्तीसाठी जात असताना त्यांना काही संशयित व्यक्ती दुचाकीसह दिसून आले. त्यांची विचारपूस केली असता एकजण पळून गेला. त्यामुळे संशय बळविल्याने दोन्ही मोटारसायकल ताब्यात घेऊन इसमांची सखोल चौकशी करण्यात आली.
यावेळी मोटारसायकल क्रमांक एमपी 38/एम.जे. 0107 व सीजी 04/एम 9754 ची तपासणी केली असता दुचाकींच्या डिक्कीमध्ये अंदाजे साडेतीन किलो गांजा लपविल्याचे दिसून आले. आरोपींना गराडा चौकीत आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी आपले नाव महेश पन्नालाल शाहू रा. बावणवाडा व देवेंद्र जगन्नाथ कहार रा. खरगून (मध्यप्रदेश) येथील रहिवासी असल्याचे व फरार आरोपीचे नाव अखिलेश गंगाराम दुबे असल्याचे सांगितले. अखिलेश दुबे यांच्या सांगण्यावरून त्यांनी उडीसा राज्यातून गांजा खरेदी करून मध्यप्रदेशात नेत असल्याची कबूली दिली.
यावरून सदर आरोपी गांजा तस्कर असल्याचे निष्पन झाल्याने त्यांना लाखनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.