शिक्षक म्हणून कार्य करण्यापेक्षा शिक्षक म्हणून जगता यायलां हवं,त्याचा आनंद बालकांसोबत घेता यायला हवं – खुर्शीद कुतुबुद्दिन शेख

मृत शाळा जिवंत विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देऊ शकतील ? म्हणून शाळांना जिवंत केलं तरच येथील विद्यार्थी सजीव शिक्षण घेऊ शकतील असे पारखड मत 2021 चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे गडचिरोली जिल्ह्यातील आसरअल्ली जि.प. डिजिटल प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांनी व्यक्त केले. गांधी विचाराने प्रेरित, शिक्षण हेच जीवन जगणारे आणि आव्हानांना संधी म्हणून पहात काम करणारे, नकारात्मकता व उदासीनतेचा लवलेशही लागू न देणारे खुर्शिद शेख हे गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मते ‘केल्याने होत आहे रे ‘ यामुळेच कदाचित या पुरस्काराचा ते कदाचित या पुरस्काराचे मानकरी ठरले असावे.

विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर सर्व प्रथम शिक्षकाने स्वतःला बदलले पाहिजे. विद्यार्थ्यांचा कल, त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन अध्यापन पद्धती स्वीकारली तर बदल ही सर्वाधिक सोपी गोष्ट ठरते. परंतु त्यासाठी  ‘केल्याने होत आहे रे’ ची कास धरली पाहिजे, यामुळेच मी कदाचित राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा मानकरी ठरलो असेल, अशी भावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे महाराष्ट्रातील दोन पैकी एक शिक्षक खुर्शिद शेख यांनी व्यक्त केली. यावेळी आनंदाने त्यांचा उर भरून आला होता. उल्लेखनीय आहे की कालच त्यांच्या या पुरस्काराची घोषणा झाली. आगामी 5 सप्टेंबरला दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सम्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबाद्ल त्यांचे देशभर अभिनंदन करण्यात येत आहे. 

आलापल्ली सारख्या मोठ्या शहरात अनेक इंग्रजी शाळा असतांना विद्यार्थी माँडेल स्कुल मिळणार नाही असे सर्वाचेच विचार होते परंतु माझ्या नाविन्यपूर्ण व गुणवत्ता पुर्ण शिक्षणाने तसेच पालक व समाज यांना शाळेशी जोडण्याच्या कौशल्याने शाळे कडे अक्षरशः विद्यार्थी धाऊ लागले आणि प्रत्येक वर्गात विद्यार्थी प्रवेश मर्यादे नुसार जास्त होऊ लागले होते खरे तर हे माझे नाही तर आनंदादायी जीवन शिक्षणाचे यश होते महाराष्ट्रतील 45 शाळां पैकी उत्कृष्ट शाळा म्हणून पुणे येथे गौरव झाला. आज ही अहेरी येथे ही शाळा विद्यार्थ्यांनी फुलली आहे. त्यांनतर माझी पदविधर शिक्षक म्हणून पदोन्नती झाली आणि तेलंगणा व छत्तीसगड राज्यच्या सीमेवरील स्वतः हुन जि. प उच्च प्राथमिक शाळा आसरअल्ली ता सिरोंचा ही निवडली. आव्हानात्मक कार्य वाटच बघत होते कारण शाळा ही शेवटच्या घटकामोजत होती 45 विद्यार्थी एक वर्गात डोबुंन व शाळेचा मृत परिसर, तेलगु भाषेचा व संस्कृतीचा अतिशय प्रभाव त्यामुळे अभ्यासक्रमीक मराठी भाषेपासुन कोसो दुर असलेले विद्यार्थी त्यांना मराठी भाषा अवगत नसल्याने त्यांना अभ्यासा विषयी गोडीच नव्हती.. निराश व हताश झालेले माझे सहयोगी शिक्षक होते. त्यात माझे माँडेल स्कुल आलापल्लीचे यशस्वी सेवा बघता मला सिरोंचा येथील माँडेल स्कुल येथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले.परंतु मी माझ्या या असरअली शाळेला जीवनदान देण्याचा मनाशी निर्धार केलेला होता आणि ती प्रतिनियुक्ती स्विकारली नाही. खालील प्रमाणे अविरतपणे माझे विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम सुरू झाले एवढच नाही तर शाळेला शैक्षणिक संशोधन केंद्र बनवुन प्रत्येक येणाऱ्या समस्यांचा उपाय शोधने ही सकारात्मक भूमिका घेतली –

प्रश्न : आपण जीवन शिक्षणाची प्रेरणा कुठून घेतली ?

उत्तर : मी सुरूवातीपासूनच गांधी विचाराने प्रेरीत होते. शैक्षणिक जीवनात महात्मा गांधीचे स्वावलंबन आणि प्रयोगशील विचारधारा माझ्यात भिनली होती. शिक्षण हे केवळ पुस्तकापूरते मर्यादित नाही. त्यामुळे महात्मा गांधीचा जीवन शिक्षणाचा मार्ग हीच माझी प्रेरणा आहे.

प्रश्न : आपल्या या पुरस्काराच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?

उत्तर : मी कधीही कुठल्याही पुरस्कारासाठी कधीच काम केलं नाही. पुरस्कार हा जरी कामाची पावती ठरणारा असला, तरी हा पूर्णविराम नाही. 17 सप्टेंबर 1996 साली सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झालो. आज या प्रवासाला 25 वर्ष पूर्ण झालीत. दुर्गम गडचिरोलीत कधी पायी तर कधी सायकलने शाळा गाठल्या. अहेरी तालुक्यातील वेलगुर, मैदारम या आदिवासी बहूल, तेलगु भाषेचा प्रभाव असलेल्या शाळा सांभाळल्या. 2011-12 मध्ये 4 विद्यार्थ्यांना घेऊन अहेरी येथील इंग्रजी माध्यमाची माॅडेल स्कुल ते जि.प. प्राथमिक शाळा आसरअल्ली असा प्रदीर्घ काळाचा हा प्रवास आहे. या प्रवासा दरम्यान जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे शाळा मृतावस्थेत पाहील्या. या मृत शाळा जीवंत विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देऊ शकतील असा प्रश्न उभा राहिला आणि त्यातून शाळा जीवंत करीत गेलो. त्याची फलश्रृती आज मिळाली.

प्रश्न : शाळा सजीव करण्यासाठी आपण कोणते उपक्रम राबविले, कसले प्रयोग केले ?

उत्तर : मृत शाळांची कारणमीमांसा करताना शिक्षकांची नकारात्मकता, उदासीन वृत्ती दिसून आली. मी ही नकारात्मकता आणि उदासिनता माझ्या जवळही येऊ दिली नाही. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर सर्वप्रथम शिक्षकाने स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजे. हे स्वीकारून विद्यार्थ्यांच्या कलाकलाने त्यांच्यातील कलागुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यात गावातील नागरिक, पालक आणि स्थानीक प्रशासनाचा सहभाग घेतला. 2013 मध्ये मी आसरअल्लीच्या शाळेत रूजू झालो त्यावेळी तिथे 43 विद्यार्थी होते. आज तिथे 206 विद्यार्थी आहेत. विकास यासाठी आनंददायी नवोपक्रम, फिटनेस क्लब, स्वावलंबन केंद्र, मी रिपोर्टर, शिकू आनंदे असे अनेक उपक्रम सुरू केले. हे सर्व मी त्या अनेक विद्यार्थ्यांमधील एक विद्यार्थी होऊन केले.

प्रश्न : कोरोनाच्या या दोन वर्षांच्या काळात आपण कसे शिक्षण दिले ?

उत्तर : कोरोना काळात शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे नियोजित होते. परंतु या भागात नेटवर्कचा आणि एण्ड्राईड मोबाईलचा मोठा प्रश्न असल्याने ऑफलाईन शिक्षणच द्यावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळेबाहेरची शाळा आम्ही भरवली. शाळेच्या लाऊडस्पीकरवरून विद्यार्थ्यांना धडे दिले. आमच्या 5 ही सहकारी शिक्षकांसमवेत गृहभेटी दिल्या. ऑनलाईन शिक्षण मागवून ते स्टोअर केले व नंतर ते प्रोजेक्टर, लॅपटाॅपचा वापर करून शिकवले. ‘एटीएम’ अर्थात एक्टीव टीचर्स इन महाराष्ट्र या प्रयोगांर्तगत ‘मस्ती की पाठशाला’ हा कार्यक्रम राबविला. दर शनिवारी शिकू आनंदे हा प्रयोग केला. आणि विद्यार्थ्यांसाठी हाॅलीवूड आणि बाॅलीवूड च्या धर्तीवर ‘जाॅलीवूड‘ चा म्हणजेच जायफूल लर्निंग इन चाइल्डहूड ची निर्मिती केली व विविध प्रकारचे 11 लघुपट यात निर्माण करून ते प्रोजेक्टर च्या सहायाने विद्यार्थ्यांना दाखविले. कोरोनामुळे जगात सगळीकडे भीतीचे वातावरण असताना आसरअल्लीतील विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत होते.

प्रश्न : आपल्यावर पत्रकारीतेचाही प्रभाव असल्याचे सांगितले जाते ?उत्तर : होय, हे खरे आहे. माध्यम जगातील अनेक बाबींना उघड करतात. त्यांचे वास्तव स्वरूप नागरिकांसमोर आणतात. कित्येकांना न्याय देण्याचे काम करतात. चौथा स्तंभ म्हणून मीही प्रभावित आहे. म्हणूनच आसरअल्लीच्या शाळेत आम्ही ‘मी पत्रकार’ असा प्रयोग केला. यात शाळेतील अनेक विद्यार्थी माईकसमोर उभे राहून व्यक्त होतात. यातून त्यांच्या क्षमतांचा विकास होतो. मला 2017 ला जेव्हा जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला तेव्हाही माध्यमांनी सकारात्मक भूमिकेतून मांडणी केली होती.

प्रश्न : आपल्या क्षेत्रातील सहकाऱ्यांना आपण काय संदेश द्याल ?उत्तर : उत्तर सोपं आहे. जे काम हाती घेतलं ते जीवनकार्य म्हणून करा. निराशा, उदासिनतेला तिलांजली द्या, शाळा जीवंत करा आणि देशाच्या उद्याच्या नागरिकांना सशक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. ‘केल्याने होत आहेत रे, आधी केलेची पाहिजे’, हा मंत्र स्वीकारा.

Share