येणारे ५ दिवस महाराष्ट्रात गारपीटीसह पावसाची शक्यता : हवामान विभाग
प्रहार टाईम्स
वृत्तसंस्था नागपूर : आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पावस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच भागांत आजपासून पुढील पाच दिवस वारा आणि गारपीटीसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याने जिल्हानिहाय पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, रविवारी – सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि संपूर्ण मराठवाडा या भागात पाऊस पडणार आहे. तर सोमवारी – सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा… मंगळवारी- अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा… बुधवारी – अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील ब्रह्मपूरी याठिकाणी तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला असून येथील तापमान 42.8 अंश सेल्सिअस इतकं आहे.