“वावर आहे तर पावर आहे” कारल्याचे शेतीतून भरघोस उत्पादन पण आठवडी बाजार बंदमुळे निराशा
लाखनी 22:
शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरुण आपण सध्या पाहतो, परंतु या आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी मास्तरकी आणि इंजिनिअरिंगची पदवी असलेल्या तरुणांना तुटपुंज्या पगारावर नोकरी करायला लागत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने शेती केली तर थोड्या शेतीतूनसुध्दा लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतो हे पालांदूर येथील स्वप्नील नंदनवार नामक तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर या गावांमध्ये आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेती करणारा तरुण स्वप्निल नंदनवार आपल्या दोन भावंडांना सोबत घेऊन व आपल्या आई-वडिलांसोबत गेल्या दोन-तीन वर्षापासून धानाच्या शेतीसह भाजीपाला उत्पादन घेत आहे. यंदा त्याने आपल्या शेतामध्ये कारल्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले होते. यावर्षी मार्च महिन्यामध्ये त्याने आपल्या शेतामध्ये आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड केली. सुरुवातीला बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपरने हे बेड पूर्णपणे झाकून घेऊन त्यावर कारल्याची लागवड केली. घरच्या घरी स्वतः बांबू आणि तारेच्या साह्याने मांडव तयार केला. सध्याच्या स्थितीत या शेतातील कारल्याच्या वेलींना कारले लगडले आहेत. या कारल्यांना बाजारपेठेत 50 ते 60 रुपये किलो असा दर मिळाला पाहिजे. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरकारने आणि प्रशासनाने आठवडी बाजारावर बंदी घातल्यामुळे त्यांना आपला माल कोराना काळात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या भंडाराच्या सब्जी मार्केट मंडी मध्ये विकावा लागत आहे. जर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नसता तर त्यांच्या कारल्यांना योग्य भाव मिळाला असता. परंतु ,आठवडी बाजारच्या बंदीमुळे त्यांना आता अर्ध्या किमतीतच कारल्याची विक्री करावी लागत आहे. आतापर्यंत त्यांच्या शेतामध्ये तीन तोडे झाले असून तिसऱ्या तोड्यात त्यांच्या शेतामधून 1070 किलो कारले निघाले आहेत. अजून मोठ्या प्रमाणावर कारल्याचे उत्पादन निघण्याची अपेक्षा स्वप्निल आणि बंधूंनी व्यक्त केली. या कारल्याच्या प्लॉटमध्ये वेलींना मोठ्या प्रमाणावर कारली लगडली असून फुलेही मोठ्या प्रमाणात आली आहेत. कारल्याचे खरे उत्पादन या पुढच्या काळात निघणार असून ते लाखोच्या घरात जाईल असे दिसत आहे, परंतु लाॕकडाऊनमुळे कारल्याला योग्य भाव मिळणार की नाही या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. नियोजन करून पिकांची निवड केली व कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्कीच शेती फायदेशीर ठरत असल्याचे स्वप्नीलने दाखवून दिले आहे.
“शेतीमध्ये नोकरीत इतका पैसा, कष्टाची तयारी ठेवा
आजचा तरुण शेतीव्यवसायाला दुय्यम स्थान देऊन तुटपुंज्या पगारावर शहरात नोकरी करण्याचे पसंत करतो. मात्र, तोच वेळ जर आपण आपल्या शेतीत दिला तर नक्कीच शेतीमध्ये उत्पादन चांगल्या प्रकारचे निघते. त्यामुळे आजच्या तरुणांना माझे एकच आवाहन आहे की शेतीमध्ये सुद्धा नोकरी इतका पैसा मिळू शकतो. फक्त कष्टाची तयारी ठेवा.”
….स्वप्निल नंदनवार, प्रगतशील शेतकरी, पालांदूर.
तीन एकर तीन भाऊ
भाजीपाला उत्पादनातून “वावर आहे तर पावर आहे”
याची दिली प्रचिती!
प्रगतिशील शेतकरी स्वप्निल बीए डीएड, आशिष एम.ए, बी.एड. तर अंकुश मेकॅनिकल इंजिनिअर आहे. या तिघांनी नोकरीसाठी धडपड केली. पण योग्य नोकरी मिळू न शकल्यामुळे तिन्ही भावंडांनी आपल्या शेतीतून समृद्धी साधण्याचे ठरविले. त्यानुसार स्वप्निलच्या पुढाकारातून भाजीपाल्याची शेती सुरू झाली. पुढे आशिषने देखील स्वप्नीलची मदत सुरू केली.सुरुवातीला केवळ दीड एकर जागेवर विविध पारंपरिक पिकांची लागवड केली. यापैकी काकडीच्या पिकाने बर्यापैकी कमाई करून दिली. त्यामुळे दोघांनी भाजीपाल्याची शेती अधिक तंत्रशुद्ध करण्याचे ठरवले. त्यांनी टप्प्याटप्प्याने चांगले अनुभव येत गेले. दरम्यानच्या काळात अंकुश नागपुरात मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होता. त्याच्या मदतीने रिलायन्स फ्रेशशी संपर्क करून त्यांनाही भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला. आता हे तिघे भाऊ सामूहिकरीत्या आपल्या शेतात मेहनत घेतात. पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी नव्या दमाने आणि जोमाने शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे आशिषला मार्केटिंगचे कौशल्य असल्याने तो आपला भाजीपाला कुठे आणि कसा विकायचा याची नियोजन करतो. तर स्वप्नील व अंकुश शेतातील सर्व कामाचे नियोजन करतात. अर्थात या व्यवसायाशी संबंधित सर्व छोटे मोठे निर्णय तिघे मिळून घेतात. त्यामुळे अवघ्या तीन वर्षांच्या काळात या तीन नंदनवार भावंडांनी शेतीतून देखील एक चांगला स्टार्टअप होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
लाखनी तालुका जिल्ह्यात मागासला असला तरी, येथे बऱ्यापैकी शेतीवर प्रयोग करीत असल्याचे स्वप्नील यांनी सांगितले. त्यातून नवनवीन प्रयोग करण्यात येतात. असाच प्रयोग स्वप्नील आणि त्याच्या भावांनी केला. ग्रामीण भागातही स्टार्टअपचे प्रयोग होत आहेत. त्यातून व्यवसाय वाढ होत असून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकारची व्यवसायाने ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे स्वप्निल आणि त्याचे भाऊ सांगत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज अनेक युवक कृषी व्यवसायात नवनवीन प्रयोग करीत असल्याचे दिसून येत आहे.
माजी सरपंच असलेले वडील शंकर नंदनवार यांनी त्यांचे वडील माजी जि.प. सदस्य मुरलीधर नंदनवार यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून राजकारणासोबत पारंपारिक शेती केली. आता माजी सरपंच असलेल्या बापाची मुलांना साथ मिळत असून स्वप्निलचे वडील शंकर नंदनवार हे गावचे माजी सरपंच असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुरुवातीला त्यांनी व नंतर स्वप्निल, आशिष व अंकुशने शेतीमध्ये आपले लक्ष केंद्रित केले.
भंडारा जिल्ह्यातील पालांदूरच्या नंदनवार बंधूंनी एक स्टार्टअप सुरू केला. तो ही चक्क आपल्या वावरात. अवघ्या तीन वर्षांच्या शेतीव्यवसायात स्वप्निल, आशिष व अंकुश या तिघांनी आपल्या माजी सरपंच असलेल्या वडिलांसोबत ‘वावर आहे तर पाॕवर आहे’ हे सिद्ध करून दाखवलं.