आमगावचे गशिअ निलंबित तर सालेकसाच्या गशिअवर कारवाईची टांगती तलवार

एका जनप्रतिनिधीच्यावतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्याचे भोवले

गोंदिया : आमगाव व सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एका जनप्रतिनिधीच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्याचे आदेश दिले. मात्र हे आदेश दोन्ही गटशिक्षणाधिकाऱ्याच्या अंगलट आले आहेत. स्थायी समितीच्या सभेत एका सदस्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व मुकाअ यांनी आमगावचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर सालेकसाच्या स्थायी गटशिक्षणाधिकाऱ्यावर कारवाईचे प्रस्ताव आयुक्ताकडे पाठविण्यात आले आहे. मात्र सावत्र भुमिकेतून केलेल्या कारवाईची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीन पं. स. च्या गटशिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवालही उपस्थित होवू लागला आहे.

सविस्तर असे की, आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्याकडून १२ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अनुसंगाने आमगाव व सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील शालेय प्रशासनाला सकाळ पाळीत शाळा भरविण्याच्या सुचना केल्या होत्या. अध्यापनाचे कर्तव्य बजावून शिक्षक सदर कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र या कार्यक्रमाला घेवून नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एका सदस्याने सकाळपाळीत शाळा कशी का भरविण्यात आली?, असे अधिकार गटशिक्षणाधिकाऱ्यांना आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण

विभागाने आमगाव येथील गटशिक्षणाधिकारी रामटेके व सालेकसाचे गटशिक्षणाधिकारी डोंगरे या दोघांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाचे उल्लंघन केले, असा ठपका ठेवून मुकाअ यांच्याकडे दोन्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर केले. यानुरूप मुख्य कार्यपालन अधिकारी मुरूगानंथम यांनी अधिकाराचा उपयोग करीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामटेके यांना निलंबित केले. तर सालेकसाचे गटशिक्षणाधिकारी डोंगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,असे प्रस्ताव आयुक्ताकडे प्रस्तावित केल्याची माहिती आहे. मात्र या सावत्र कारवाईमुळे जिल्हापरिषद प्रशासनाचा मनमर्जी कारभार चांगलाच चर्चेत आला आहे.

कर्तव्यात कसूर अधिकाऱ्यांवर कारवाई करणे – प्रशासनिक बाब आहे. मात्र भेदभावपूर्ण कारवाई करणे हे कुठले न्यायसंगत आहे. शाळा भरविण्यात आली, अध्यापनाचे कार्य पूर्ण झाले असतानाही कसलीही शहनिशा न करतात्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तर माग तिरोडा, गोंदिया व गोरेगाव या तिन्ही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना अभय देण्याचे कारण काय? हे समजण्यापलीकडे आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची भुमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. अधिकारी सत्तापक्षाच्या दबावात येवून अशा प्रकारे उलटसुलट कारवाई करीत आहेत.

  • सहषराम कोरोटे, आमदार

गोंदिया, गोरेगाव व तिरोड्यातही तसाच प्रकार

गोंदिया येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून १३ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सकाळपाळीची शाळा भरविण्यात आली होती. तसेच तिरोडा व गोरेगाव येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ५ सप्टेंबर रोजी सकाळपाळीची शाळा भरविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या तिन्ही पंचायत समिती कार्यक्षेत्रात आमगाव व सालेकसाप्रमाणेच प्रकार घडून आला असला तरी गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Share