आमचा जाहिरनामा म्हणजे लोकांचे मत: राहुल गांधी

साकोली: काँग्रेसचा जाहिरनामा हजारो लोकांचे मत घेऊन तयार झालेला एक विचार आहे. गोरगरीब, आदिवासी, ओबीसी वर्गाच्या उत्थानासाठी काँग्रेसच्या अनेक योजना आमचे सरकार आल्यास आम्ही राबवू. दहा वर्षात नरेंद्र मोदींनी सामान्य जनतेसाठी कोणत्याच कल्याणकारी योजना राबविल्या नाही. केवळ अदानी,अंबानी सारख्या उद्योगपतींसाठी हे सरकार होते. आम्ही जनतेचे सरकार आणू, असे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सांगितले.

SJADF

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. पडोळे यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांची सभा आज सेंदूरवाफा येथे झाली. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अभिजीत वंजारी, माणिकराव ठाकरे, आ.सहसराम कोरेटी, शिवकुमार गणवीर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी बोलताना गांधी म्हणाले, मोदी मुख्य मुद्यांकडून लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत. आज बेरोजगारीची समस्या मोठी आहे. गरीब शेतकरी कर्जमाफीची वाट पहात आहे. मात्र 22 उद्योगपतींचे कर्ज त्यांनी माफ केले. हे सरकार सामान्यांचे नाही तर उद्योगपतींचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माध्यमांवरही आगपाखड केली. माध्यमे केवळ मोदीच दाखवितात, जनतेचा आवाज उचलत नसल्याचे ते म्हणाले. आज ओबीसी, दलित आणि मागास वर्गाला महत्वाच्या कोणत्याही निर्णायक ठिकाणी स्थान नाही, असेही ते म्हणाले. भाषणात त्यांनी आपल्या कश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रेचा उल्लेख केला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाला राष्ट्रपती मुर्मू यांना बोलविण्याचे टाळल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यास जातीनिहाय सर्व्हेक्षण करू, महिलांना वार्षिक 1 लाख रुपये देवू असेही त्यांनी सांगितले. चुकीच्या जीएसटी मध्ये सुधारणे करणे, मनरोगातून रोजगाराचा अधिकार, प्रत्येक घरी एकाला रोजगार देणे अशा अन्य योजना अमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहूल गांधींनी पूर्ण भाषणात लोकसभा उमेदवाराचा कुठेही उल्लेख केला नाही.

Share