आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली, पालकांची चिंता वाढली

गोंदिया: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या अंतर्गत शासनाकडून आभासी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी, मार्च महिन्यात राबविली जाते. मात्र एप्रिल महिन्याचा पंधरवडा लोटत असताना प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वंचित व दुर्बल घटकांतील बालकांनाही नामांकित खासगी शाळेत मोफत प्रवेश घेता यावा यासाठी आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी पात्र शाळांत 25 टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवल्या जातात. जिल्ह्यातील 143 शाळांमधून 860 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली मध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो. दरवर्षी सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाते. फेब्रुवारी मार्च महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरुवात होते. यंदा अद्यापही विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने पालकांमधून विचारणा होत आहे. आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे, त्यानंतर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करीत प्रवेश फेर्‍या राबविणे, कागदपत्रांची पडताळणी यासाठी पुढील दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया लांबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, आरटीई अंतर्गत असलेल्या शाळांचे शासनाने अनुदानही थकविले आहे. त्यामुळे संचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आरटीई प्रवेशासाठी कागदपत्रे

रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबूक, भाडेतत्त्वावर राहणार्‍या पालकांसाठी भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा, जन्मतारखेचा पुरावा. जात प्रमाणपत्र, 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे दिव्यांग प्रमाणपत्र.

Print Friendly, PDF & Email
Share