वाघिण बेपत्ता? सॅटेलाईट जीपीएस कॉलर जंगलातच पडून !

गोंदिया: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 11 एप्रिल रोजी सोडण्यात आलेली एनटी 3 वाघिण संपर्क बाहेर झाली आहे. वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाघिणीला लावण्यात आलेले सॅटेलाईट जीपीएस कॉलर 12 एप्रिलपासून एकाच ठिकाणी सिग्नल देत आहे. दरम्यान व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी राबविलेल्या शोध मोहिमेत सॅटेलाईट जीपीएस कॉलर चालू स्थितीत नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्र. 95 मध्ये जमिनीवर पडलेले आढळले असून वाघिणीचा शोध सुरू असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

news

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन स्थानातरण उपक्रमातंर्गत दुसर्‍या टप्प्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एनटी 3 वाघिण 11 एप्रिल रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याच्या कक्ष क्र. 95 मध्ये सोडण्यात आली होती. या वाघिणीला सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावून व्हीएचएफ चमूद्वारे सनियंत्रण केले जात होते. मात्र, 12 एप्रिलपासून वाघिणीचे सॅटेलाईट जीपीएस कॉलरचे सिग्नल तसेच व्हीएचएफ चमुला प्राप्त सिग्नल एकाच ठिकाणी येत असल्याने 13 एप्रिलपासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांकडून शोध मोहिम राबविण्यात आली. यादरम्यान सॅटेलाईट जीपीएस कॉलर चालू स्थितीत नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्र. 95 मध्ये जमिनीवर पडलेले आढळले. याठिकाणाच्या 1 किमी परिसरात वाघिणीचा शोध घेतला जात असून, या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

विशेष म्हणजे, वाघिणीने सॅटेलाईट जीपीएस कॉलर स्वतःहून काढले असल्याची शक्यता असल्याचे क्षेत्रीय अधिकार्‍यांचा कयास आहे. वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी शोध घेत आहेत. क्षेत्रात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरा लावून वाघिणीला पुन्हा सॅटेलाईट जीपीएस कॉलर लावण्याकरिता क्षेत्रीयस्तरावर प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, प्रमोदकुमार पंचभाई यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share