अंगणवाडीच्या जीर्ण इमारतीचे छत कोसळले

Goregaon ◼️पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या इमारती अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. त्याच इमारतीत बसून चिमुकल्यांना धडे गिरविण्यात येत आहेत. अशाच जीर्ण झालेल्या गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे छत शुक्रवार 12 एप्रिल रोजी सकाळी कोसळले. यात साहित्याचे नुकसान झाले असले तरी चिमुकले मात्र थोडक्यात बचावले.

गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी क्र. 1 ची इमारतीच्या स्लॅबचे काँक्रिट गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास कोसळले. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अंगणवाडीतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  टेबल, खुर्ची व इतर साहित्य तुटले. सकाळची वेळ असल्यामुळे मुले घरी होती. जर अंगणवाडी भरण्याच्या वेळेत ही घटना घडली असती तर चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला असता. घटनेची माहिती मिळताच मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी अंगणवाडीत जाऊन पाहणी केली. अंगणवाडी इमारत जीर्ण झाली असून ग्रामपंचायतमार्फत नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी प्रस्ताव व निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अनेकदा देण्यात आले. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी न खेळता तातडीने इमारतीची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी सरपंचांनी केली.

Share