गोंदिया: शैक्षणिक कामे सोडून ऑनलाईन कामांमध्ये शिक्षकांना जुंपले, गुणवत्ता विकासावर प्रशासनाची गुंगी

प्रहार टाईम्स

गोंदिया : महाराष्ट्र राज्य मागास आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत, या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सर्वेक्षणाच्या कामात जिल्ह्यातील शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्य प्रभावित झाले असून अनेक शाळा शिक्षकांअभावी ओस पडल्याचे चित्र आहे.

एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शासनाचा भर असल्याचे गवगावा केला जातो तर दुसरीकडे याच शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामात गुंतविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 23 ते 31 जानेवारी दरम्यान सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. यासाठी प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 20 प्रगणकांवर एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रगणक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. प्रगणकांना सर्वेक्षणादरम्यान 125 ते 150 प्रश्‍नांची माहिती भरावयाची आहे. 31 जानेवारीनंतर संकलित माहिती मागासवर्ग आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे.

२०२३-२०२४ हे संपूर्ण शैक्षणिक सत्र सरल डेटाबेस, यू डायस प्लस, आधार फेरिफिकेशन, आधार अपडेट, एसडीएमआई पोर्टल, नवसाक्षर , माझी सुंदर शाळा, सेल्फी विथ माती, परीक्षा पे चर्चा विद्यार्थी पालक शिक्षक डेटा अपलोड, अशा विविध ऑनलाइन कामामध्ये गेला असून यामुळे शालेय शिक्षणावर आणि विद्यार्थ्यांवर कमालीचा परिणाम झाला असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास नामशेष झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

विशेष म्हजणे शिक्षकांना अध्यापनापेक्षा फक्त ऑनलाईन माहिती भरून तात्काळ शालेय अध्यापनाच्या वेळेवर माहिती मागतली जात असल्यामुळे शिक्षकांना अध्यापन कामाला वेळ मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

शिक्षक व विविध शिक्षक संघटना शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये अशी मागणी करीता असताना देखील दरवेळी शिक्षकांना या ना त्या कामात गुंतविले जाते. जिल्ह्यात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त असताना सर्वेक्षणासाठी 80 टक्के शिक्षकांना कामावर लावण्यात आले आहे. अनेक शाळा एक शिक्षकी आहेत. त्यामुळे या शाळेतील अध्यापनाचे कामे प्रभावित झाली आहेत. आज अनेक शाळा ओस पडल्याचे चित्र होते. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गजभिये यांना विचारले असता सुट्टीवर असल्याचे सांगितले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शेख यांनी मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले.

वेळोवेळी शिक्षकांवर अशैक्षणिक कामे थोपविली जातात. शिक्षकांना अध्यापनाची कामे करू द्या, अशी मागणी असताना देखील सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन सुरू आहे. येत्या दिवसांत वार्षिक परीक्षा देखील येतील, अभ्यासक्रमही पूर्ण करायचा असल्याने पुन्हा शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम दिल्याने अध्यापनाचे कार्य प्रभावित झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सांगितले.

Share