महाराष्ट्रात 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिवस म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिल लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून हाफ डे देण्याचा निर्णय
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्माचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.