देवरी सह चार तालुक्यातील मद्यविक्री राहणार बंद

◼️मध्यप्रदेश, छत्तीगसड मतदान प्रक्रियेसाठी निर्णय

गोंदिया : छत्तीसगड व मध्यप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी होणार्‍या मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील या राज्याच्या सीमावर्ती पाच तालुक्यात देशी व विदेशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले आहे. निवडणूक आयोगाद्वारे छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात सार्वजनिक विधानसभा निवडणूक-2023 कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

छत्तीसगड राज्यात 7 व 11 नोव्हेंबर या दिवशी व मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया आहे. या कालावधीत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणार्‍या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यासह तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपासून 5 किमीच्या परिसरातील गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, देवरी, सालेकसा व आमगाव तालुक्यातील देशी, विदेशी किरकोळ मद्यविक्री दुकाने 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापासून ते 7 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापासून ते 17 नोव्हेंबर 2023 रोजी संपुर्ण दिवस आणि 3 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करुन अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी कळविले आहे.

Share