गोंदिया जिल्हात स्वेच्छा निवृत्ती घेणार्‍या शिक्षकांची संख्या वाढली!

◼️देवरी तालुक्यात सर्वाधिक ४६ शाळेत एकच शिक्षक

गोंदिया◼️जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षक नेहमी विविध कारणांसाठी प्रकाशझोतात राहतात. विविध उपक्रम राबवूनही जिल्हा परिषदांच्या शाळाची गुणवत्ता व दर्जा खालावल्याचे नुकत्याच एका सर्व्हेक्षणातुन उघड झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातही सरकारी शाळांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता शासनाने सरकारी शाळांतील शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामे लादल्याने स्वेच्छा निवृत्ती घेणार्‍या शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना राज्यासह जिल्ह्यातील शिक्षक भरती गुलदस्त्यात आहे. विद्यार्जनाची कामे ताशिका शिक्षक, स्वयंसेवक व कार्यरत शिक्षकांच्या भरवश्यावर केली जात आहेत.

दिवसेंदिवस कार्यरत शिक्षकांवरील कामाचा ताण वाढतच आहे. शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शैक्षणिक धोरण आणि गैरशैक्षणिक कामांचीही भरमार आहे. भरतीचे प्रमाण कमी आणि सेवानिवृत्तीचे प्रमाण जास्त असल्याने गुरुजींचा ताप वाढतच चालला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दरवर्षी 200 पेक्षा अधिक शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. मागील 10 वर्षात शिक्षक भरती झाली नाही. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1038 शाळा आहेत. या शाळांमध्ये 43 हजार 835 मुले व 43001 मुली अशी 86 हजार 836 विद्यार्थीसंख्या आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक अशी 900 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

असे असताना कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांकडून दर्जेदार, गुणवत्तापुर्ण शिक्षण देणावर भर दिला जात आहे. मात्र काही गैर शैक्षणिक कामे, आभासी कामे, दैनिक अहवाल, माहितीचा ताण शिक्षकांवर येत असल्याने स्वेच्छा निवृत्ती घेणार्‍यांच्या संख्येत भर पडत आहे. परिणामी एका शिक्षकावर तिनचार वर्गांची शैक्षणिक जबाबदारी आहे. याशिवाय राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण व दररोज निघणारे परिपत्रक आणि त्यांची अंमलबजावणी यासर्व बाबीत गुरफटलेले शिक्षक शैक्षणिक दर्जा उंचावणार तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांअभावी ओस पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

178 शाळा एकशिक्षकी

जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची वानवा आहे. येथील जिल्हा परिषदेच्या तब्बल 178 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहे. गोंदिया तालुक्यातील 11 शाळा एकशिक्षकी आहेत, आमगाव 8, अर्जुनी मोरगाव 22, देवरी 46, गोरेगाव 16, सडक अर्जुनी 18, सालेकसा 32 आणि तिरोडा तालुक्यातील 25 शाळांमध्ये एकच शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहे. एका शिक्षकावर चार वर्गांची जबाबदारी असल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिकवणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

Share