देवरी तालुक्यातील प्रशिक्षणाला गेलेले 16 सरपंच अर्ध्या रस्त्यातूनच परतले..
देवरी◼️: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2022-23 अंतर्गत सरपंचांचे चार दिवसीय पायाभूत प्रशिक्षण चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले. पंचायत समितीने त्यासंदर्भात देवरी तालुक्यातील 16 सरपंचांना निमंत्रण दिले. मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आयोजकांनी प्रशिक्षक आले नसल्याने प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याचे कळविले. त्यामुळे सरपंचांना परत यावे लागते. त्यामुळे शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनाचे पितळ उघडे पडले.
चंद्रपूर येथील वन प्रबोधिनी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत चार दिवसांचे निवासी क्षमता बांधणी उजळणी, पायाभूत प्रशिक्षण 9 ते 12 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सरपंच पदाची कार्ये, जबाबदारी, गावाचा सर्वांगिण विकास आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्याकरिता जिल्हा परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार देवरी पंचायत समितीने तालुक्यातील 16 सरपंचांची निवड केली. त्यात मुरपार, चिचेवाडा, फुक्कीमेटा, ढिवरीनटोला, ओवारा, भागी, पुराडा, डोंगरवार, पिपरखारी, चिचगड, पळसगाव, शेडेपार, जेठभावडा, मुल्ला, पलानगाव व वांढरा या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आमंत्रित करण्यात आले.
यात 15 महिला व 1 पुरुष सरपंचाचा समावेश होता. आपल्याला प्रशिक्षणात उपयुक्त माहिती मिळणार असल्याने सरपंच देखील जाण्यास उत्सुक होते. ते सरपंच खासगी वाहनाने चंद्रपूरला जाण्यासाठी 8 मार्च रोजी निघाले. परंतु अर्ध्या रस्त्यात त्यांना प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे ते सरपंच माघारी परतले. उल्लेखनीय म्हणजे, नियोजन करताना आयोजकांनी काळजी घेतली की नाही, सरपंचांना नाहक त्रास देण्याचे कारण काय? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.