महिला प्राचार्याला 20 हजार रुपये खंडणी मागणार्‍यांवर गुन्हा दाखल

गोंदिया ◼️चित्रफीत सामायिक करण्याची धमकी देत एका शाळेच्या महिला प्राचार्याला 20 हजार रुपये खंडणी मागणार्‍या दोन आरोपींविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत असे की, तालुक्यातील दासगाव बु. येथील अनुसया पसीने हायस्कूल तथा अर्चना पसीने कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे परीक्षा केंद्र आहे. सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे.

21 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी शाळेची एक चित्रफित बनविली. त्यानंतर त्यांनी प्राचार्य यांना भेटून तुमच्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉफी प्रकरण सुरू आहे. असे बोलून फिर्यादीला 20 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी महिला प्राचार्य यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंबुरे करीत आहेत.

Share