सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करा
-पालकमंत्री देशमुख
व्हीसीद्वारे कालवे सल्लागार समितीची आढावा बैठक
गोंदिया,दि.7 : जिल्ह्यात पाणी वापर संस्थेचे काम चांगले आहे. मात्र पाणी पट्टीचे काम व्यवस्थीत होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालन करुन त्यांच्या सहकार्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. जेणेकरुन शेतकऱ्यांना उन्हाळी धानाच्या सिंचनासाठी मुबलक पाणी मिळू शकेल. सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करावा असे निर्देश पालकमंत्री व समितीचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी बाघ प्रकल्पावरील कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.
7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत श्री देशमुख बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, भंडारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा समितीचे सदस्य सचिव रा.श्री.सोनटक्के, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.भिवगडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री चंद्रिकापुरे, नागपूर औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी, बालाघाट जलसर्वेक्षण विभागाचे कार्यपालन यंत्री यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बाघ प्रकल्पावरील कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत सादरीकरणाद्वारे माहिती देतांना श्री सोनटक्के यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या गोदावरी खोरे अंतर्गत वैनगंगा उप खोऱ्यातील गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील बाघ नदीवर सिरपूर साठवण धरण, पुजारीटोला उन्नेयी बंधारा व कालीसरार नाल्यावर कालीसरार धरण बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्याचा आंतरराज्यीय संयुक्त हा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर एकूण 35 हजार 718 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असून तालुकानिहाय गोंदिया-17859 हेक्टर, सालेकसा-7144 हेक्टर व आमगाव-10715 हेक्टर असे आहे. यात मुख्यतो धान पीक घेण्यात येतो. या प्रकल्पात घरगुती वापरासाठी 4.524 दलघमी व औद्योगिक वापरासाठी 2.93 दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आले आहे.
दरम्यान बाघ प्रकल्प उन्हाळी हंगाम 2020-21 करीता पाण्याचे नियोजनाबाबत माहिती देतांना श्री भिवगडे यांनी सांगितले की, 21 डिसेंबर 2020 रोजीचा उपलब्ध साठा सिरपूर-140.07, पुजारीटोला-30.51, कालीसरार-19.53 दलघमी असून एकूण 190.11 दलघमी आहे. यात बाष्पीभवन-38.02, वहन व्यय-28.51, कॅरी वोहर-17.00 व पिण्यासाठी आरक्षीत पाणीसाठा-7.45 असा एकूण 90.98 दलघमी वजा जाता 99.13 दलघमी पाणीसाठा सिंचनाकरीता उपलब्ध आहे. यात महाराष्ट्रासाठी 74.35 तर मध्यप्रदेशकरीता 24.78 दलघमी नियोजित करण्यात आला आहे.
यातून गोंदिया शहराकरीता पिण्याच्या पाण्यासाठी 10.00 दलघमी पाणी साठा आरक्षीत करण्यात आला आहे. तर 64.35 दलघमी पाणी साठा महाराष्ट्राच्या सिंचनासाठी उपलब्ध होईल. यात तालुकानिहाय प्रस्तावित सिंचनाचे उद्दिष्ट गोंदिया-1980 हेक्टर, आमगाव-1188 हेक्टर व सालेकसा-712 हेक्टर. असा एकूण 3960 हेक्टर नियोजित करण्यात आला आहे.
लाभधारकांना उन्हाळी हंगामाचे गाव व मायनर निहाय नियोजन संबंधित शाखा कार्यालयात पहावयास मिळेल. उन्हाळी सिंचनाकरीता बाघ डावा व उजवा मुख्य कालव्यातून 15 जानेवारी 2021 ला पाणी सोडण्यात येईल. थकबाकीदार लाभधारकांनी सिंचन पाणीपट्टी संबंधित शाखा कार्यालयात जमा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.