OPS : जुन्या पेंशनकरिता कर्मचार्‍यांची बाईक रॅली

गोंदिया 21: नविन अंशदायी पेंशन योजना रद्द करुन राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी परिभाषित पेंशन योजना लागू करण्यात यावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात आज, 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या नावे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

शासनाने राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुन्या old pension पेंशन योजनेऐवजी अंशदायी पेंशन योजना लागू केली आहे. हा बदल कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा असून जुनी पेंशन योजना लागू करावी अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. यासाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा लढा सुरु आहे. कर्मचार्‍यांचा आंदोलनाची दखल घेत 19 जानेवारी 2019 रोजी अर्थ राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या तीन बैठकी होऊन साडेतीन वर्षाचा कालावधी लोटला. परंतु अद्यापही कर्मचार्‍यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींना देखील आजही नविन पेंशन योजना लागू झालेली नाही. यावरुन नवीन पेंशन योजना कर्मचार्‍यांच्या हिताची नाही हे ध्वनीत होते. नवीन पेंशन योजनेमार्फत मिळणार्‍या संभाव्य पेंशनच्या लाभाचे स्वरुप कोणतीही शाश्वती देणारी नाही. सामाजिक सुरक्षेसाठी नवीन पेंशन योजना रद्द करुन जुनी पेंशन योजने लागू करणाच्या कर्मचार्‍यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, 21 सप्टेंबर रोजी बाईक रॅली काढून जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष एम. सी. चुर्‍हे, सरचिटणीस लिलाधर पाथोडे, सहसचिव आशिष रामटेके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share