ग्रामीण भागांतील रस्त्यांचे ‘तीनतेरा’, अपघातांमध्येही झाली मोठी वाढ

◼️स्वातंत्र्यांनंतरही नागरिकांचा संघर्ष कायम, रहदारी करणाऱ्यांचा जीव टांगणीला

◼️अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

देवरी : रस्ते देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. रस्त्यावरून देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. नागरिकांना कोसो दूर पायदळ पायपीट करावी लागते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही नागरिकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, तरीही नागरिकांच्या जिवाचे हाल थांबायला तयार नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागांतील बहुतांश रस्त्यांचे ‘तीनतेरा’ वाजल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी ? हा जनतेचा प्रश्न गत अनेक वर्षानंतरही अनुत्तरीतच आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत सर्वेक्षण केले असता अनेक गावांत जायला धड रस्ताच नसल्याचे दिसून आले. अप्पर तहसील कार्यालय असलेल्या चिचगड क्षेत्राच्या ग्रामीण भागांतील गावाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. चिचगड-पालांदूर हा मार्ग तर खड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर एवढे खड्डे पडले आहेत की, प्रवास करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे. या रस्त्यावर अनेक घटना घडल्या आहेत. यावरून या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. रस्त्यांवरील खड्यांमुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यातील खड्डेच आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे. ग्रामीण भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हजारो खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर या देशातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते ? हा प्रश्न आता सामान्य नागरिकांनाच छळायला लागला आहे. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

Print Friendly, PDF & Email
Share