पाचवीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; जाणून घ्या काय

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार शाळाही सुरु झाल्या. मात्र ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. त्या अनुषंगाने एका पाचवीतील विद्यार्थ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्याने शाळा सुरु करण्याची विनंती केली असून आम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेऊ असेही त्याने म्हंटले आहे.

सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय, सेंट्रल रेल्वे या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू (Kaustubh Prabhu) याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. तो पत्रात असे म्हणतो की, ”आमच्या आरोग्याच्या काळजीने तुम्ही प्रत्यक्षात शाळा बंद ठेवत आहात. खेडोपाड्यातील अनेक मुलांना ऑनलाइन सोयीसुविधा अभावी ऑनलाइन शिक्षण घेणे जमत नाही. गणित, विज्ञान यांसारख्या विषयाचे शिक्षण अनुभवी असले तरी ऑनलाइनमुळे शिकवण्याच्या मर्यादा पडतात. या विषयांचा पाया मजबूत होत नाही. सरसकट शाळा बंद करणार नाही असं तुम्ही म्हंटल होत. पण तुम्हीच तुमच्या निर्णयावरून असा अचानक मागे का घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकर घ्यावा.”

दरम्यान, शाळा सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या संस्थेनेही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अनेक गोरगरीब मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा बंद करू नका अशी मागणी मेस्टा संघटनेने (MESTA) पत्राद्वारे केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share