पतंगवर्गीय शत्रूकिडीच्या नियंत्रणासाठी कृषि अधिकाऱ्याने बनवला “प्रकाश सापळा”


प्रकाश सापळा सुलभ मॉडेल निर्मिती व संकल्पनाश्री.चंद्रकांत कोळी ,मंडळ कृषिअधिकारी चिचगड तादेवरी जिगोंदिया मो.नं.९४०३७७२८०४

देवरी १४: कृषि क्षेत्राची प्रगती झपाट्याने होत असताना नैसर्गिक आपत्ती बरोबर शत्रूकीड खोडकीडा,गादमाशी,नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने भात पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे.कीड निर्मिती करणारा कीडीचे पतंग नष्ट करणे गरजेचे आहे. पतंगावस्था ही अंडी घालण्यासाठी अतिशय स्पोटक अवस्था आहे. कीडींची उत्पत्ती २०० पटीने करत असते. या विषयावर चंद्रकांत कोळी यांनी मागील काही वर्षांपासून क्षेत्रिय पातळीवर कीडींच्या जीवनक्रमावर आभ्यास केला.

यामध्ये असे दिसून आले की आमावस्येच्या दिवसाच्या दरम्यान संध्याकाळी ७.०० ते ९.०० दरम्यान नर मादींचे मिलन होऊन पिकावर मादी पतंग अंडी घालायला तयार होते. तदनंतर अळी बाहेर येऊन नुकसान करते. पतंगाचे खुप निरीक्षण नोंदवल्यानंतर असे आढळले की कीडीचे पतंग हे अमावस्येच्या दरम्यान पुढे व मागे चार दिवस संध्याकाळी दिव्यावर ठराविक वेळी मोठ्याप्रमाणात गोळा होतात.म्हणून प्रित पतंगाची झड घाली ज्योतीवरी या उक्तीप्रमाणे शत्रूकीडींचे पतंग ज्योतीवर म्हणजे दिव्यावर प्रेम करतात. नरमादी पतंगाना धुंदी चढलेली असते.त्यावेळी मादी पतंग हे नर पतंगाना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कामगंध (फेरोमोन्स) स्राव हवेमध्ये सोडत असतात.त्यामुळे पतंगाचा मोठा जत्ता गोळा होतो. जर त्यावेळी शेतामध्ये प्रकाश सापळा लावला तर मोठ्याप्रमाणात पतंग ,गादमाशी ,इतर रसशोषणारे फुलकीडे ,पांढरी माशी सापळ्यामध्ये अडकून मरतात. असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.

आमावस्येच्या काळात जर शास्त्रोक्त पध्दतीचा सुधारित सापळा मॉडेल विकसित करण्याचा कोळी यांचा मनोदय होता. २०१० साली कराड येथे याची पहिली आवृत्ती प्रसारित केली. तदनंतर आज गोंदिया जिल्ह्यामध्ये या प्रकाश सापळा तंत्रज्ञानाचे प्रसार करण्याची गरज भासली म्हणून हे मॉडेल विकसित केलेली आहे.


याविभागात “प्रकाशसापळा” हा एकमेव प्रभावी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही काळाची गरज बनलेली आहे. शेतकऱ्यांना वापरण्यासाठी चिचगडचे मंडळ कृषिअधिकारी श्री.चंद्रकांत कोळी यानी प्रकाश सापळ्याचे सुलभ मॉडेल विकसित केले आहे. आता प्रायोगिक तत्त्वावर हेमंत परशराम बागडेरिया (मो.नं.७५०७३२७१२५) यांच्या हरभरा व उन्हाळी भात पिकामध्ये दिनांक :- ११/२/२०२१ रोजी आमावस्या असल्याने तेव्हापासून लावण्यात आले आहे. प्रकाश सापळ्यात खुप प्रमाणात शत्रूकीडींचे म्हणजे खोडकीडीचे पतंग, गादमाशी, सुरळीतील अळीचे पतंग,फुलकिडे, पांढरी माशी हजारोंच्या संख्येने सापडलेले आहेत. चंद्रकांत कोळी यानी शेतकर्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहीती घेण्याचे विभागातील कृषिमित्र कृषिसहाय्यक ,कृषिपर्यवेक्षक यांचेमार्फत आवाहन केले आहे.


प्रकाश सपळा लावण्याची पध्दत वेळापत्रक:– १)प्रकाश सापळा हा पिकपेरणी/लावणी झाल्यावर आमावस्येच्या अगोदर तीन दिवस व आमावस्येच्या नंतर तीन दिवस लावावा. कारण कीडीची नर मादी पतंगावस्था तयार होऊन मिलनासाठी एकत्र येतात तसेच प्रकाशाकडे आकर्षित होतात व असंख्य पतंग हे प्रकाश सापळ्यात अडकून मरतात.त्यामुळे अंडीपुंज तयार करत नाहीत म्हणून अळी आवस्था तयार होतच नाही.
२)प्रकाश सापळा संध्याकाळी ७.००वाजता लावून ९.०० वाजता बंद करावा.. कारण मित्र कीटकांचे हालचाली सुरु होतात.
३)प्रकाश सापळा एक एकर क्षेत्रासाठी एक सापळा लावावा. लावण्यासाठी शेताच्या मध्यभागी ३×३ फूटाचा कठीण उचवटा करुन घेऊन त्यावर सापळा लावावा .पावसाळ्यात त्याच्यावर पावसाचे पाणी येऊ नये अशी व्यवस्था करावी.
४)प्रकाश सापळा आकाशात चांदण्याच्या प्रकाशात लावू नये कारण त्यावेळी प्लाटमध्ये शत्रूकीडीची अळी आवस्था असते. म्हणजेच पतंग आवस्था नसते. पतंग असली तरी आकाशात भरकटते.क्षेत्रिय पातळीवर संशोधनामध्ये अशी माहीती आहे.


मित्रकीटकाबाबत महत्त्वाची सुचना इशारा :- विशिष्ट भागातील कोणत्याही पिकामध्ये जर शत्रूकीडी चा प्रभाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त होऊन मित्र कीडी निश्प्रभ ठरली असल्यास तरच प्रकाश सापळा लावावा. अन्यथा प्रकाश सापळा लावू नये.ऊस पिकामध्ये प्रकाश सापळा लावू नये. कारण ऊस पिकावरील लोकरी मावा खाणारी क्रायसोपरला कारनी(मगरी अळीचे पतंग),आणि कोनोबत्रा अँपिडोव्होरा ही पतंग वर्गीय मित्रकीड असण्याची शक्यता असते.म्हणून ऊसपिकामध्ये प्रकाश सापळा लावू नये. मोठ्याप्रमाणात खोडकीडीचा प्रादुर्भाव झाल्यास आमावस्येच्या दरम्यान चार दिवस सापळा लावायला हरकत नाही


पतंगवर्गीय शत्रूकीडी हे अतिशय खादाड व प्रचंड नुकसान करणार्या आहेत. खोडकीडी, गादमाशी,लष्करी अळीमुळे खूप नुकसान होत असल्याने अन्नधान्याची निर्मिती करण्यास फार मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. शेतकर्यांना झालेला खर्च सुध्दा परत मिळत नाही.. शत्रूकीडींची उत्पत्ती झाल्यानंतर कीड मोठी होऊन त्याची प्रतिकार शक्ती वाढल्यानंतर रासायनिक औषधांचा प्रचंड वापर सुरु आहे. वातावरण प्रदुषणामुळे तसेच जलस्रोत विषारी होऊन जीवस्रष्टीवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुख्य पिक पध्दती भातशेती असून या जिल्यातील देवरी तालुक्यातील चिचगड हा आधिवासी बहुल दुर्गम भागातील शेतकरी खरीप/ उन्हाळी हंगामात भाताची शेती करतात. गतवर्षी देवरी तालुक्यात २५हजार हेक्टर वर भात पिकाची लागवड झालेली नोंद आहे. गतवर्षी खोडकीड ,गादमाशीच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे हजारो मे.टन भातपिकाचे उत्पादन घटले आहे. या कार्यक्षेत्रामध्ये खोडकीड,गादमाशीच्या हालचाली वर निरीक्षणे नोंदवली गेली. याकीडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळा हा एकमेव पर्याय असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहे.. कारण या भागात खोडकीड गादमाशी,नवीन लष्करी अळी सारख्या शत्रूकीडीवर उपजिवीका करणारी कोणत्याही मित्रकीडीची नोंद झालेली नाही .. यासाठी पिकाच्या कालावधीत एकण चारही आमावस्याच्या दरम्यान प्रकाश सापळा लावण्याची शिफारस करणे योग्य आहे.एकात्मिक कीड व्यवस्थापनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे "प्रकाश सापळा" होय.

खोडकीडीचे जीवनक्रम(माहीती साठी):- शत्रूकीडींचे एकुण चार आवस्था आहेत. १)पतंगावस्था २)अंडीआवस्था ३)अळीआवस्था ४)कोषावस्था मधून परत पतंगावस्था अशा या आवस्था कीडींच्या आहेत.शेतकऱ्यांना कीड हे एकमेव आवस्था माहीती आहे. या चार आवस्थेमधील पतंगावस्था ही आमावस्ये दरम्यान नर मादीच्या मिलनानंतर मादी तीन ते चार दिवसात १००ते २०० अंडी पुंजक्यानी धानाच्या शेंड्यावर घालते.अंड्यातून ५ ते ८ दिवसात अळ्या बाहेर येतात व धानाच्या मुख्य खोडास पोखरून आतमध्ये उपजीविका करतात.अळी आवस्था १६ ते २७ दिवसाची असते.अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते.आणि ९ ते १२ दिवसात कोषातून पिवळ्या रंगाचा पतंग बाहेर येतो.एक जीवनक्रम पुर्ण करण्यास ३१ ते ४० दिवस लागत असून एका हंगामात ४ ते ६ पिढ्या पुर्ण होतात. त्यामुळे एका हंगामात ९ लाख कीडी निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकते.
(स्रोत विस्तार शिक्षण संचालनालय डॉ.पंदेकृवि अकोला प्रकाशन क्र.पुस्तिका /डॉ पंदे कृवि/प्रका/२६२/२०११)
शत्रूकीडींच्या नियंत्रणासाठी सुलभ प्रकाश सापळा मॉडेल निर्मिती केलेली आहे.


प्रकाश सापळ्याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत
प्रकाश सापळ्याचे नामकरण— “सुचंद्र प्रकाश सापळाअसा करण्यात आला आहे…….
१)शेतकऱ्यांना शेतामध्ये सुलभ पध्दतीने वापरता येण्यासारखा बनवलेला आहे.
२)पिकाच्या उंची वाढेल तसे खाली वर सरकवता येतो.
३)या प्रकाश सापळ्यास पिवळा रंग दिल्याने कीडींच्या पतंगाना पिवळा रंग हा आकर्षित करतो
४)शेतामध्ये लाईटची सोय असल्यास कींवा नसल्यास दोन्ही ठीकाणी वापरता येईल. ( विद्युत बल्ब व कंदील दोन्हीही लावण्याची सोय केलेली आहे.)
५)कंदील/लाईट पासून जवळच खाली घमेले मांडण्यात आले आहे.त्यामध्ये राँकेल कींवा कीटकनाशकयुक्त पाणी ठेवण्याची सोय केलीली आहे.
६)”सुचंद्र प्रकाशसापळा” तयार करण्यास २०००/- रुपये खर्च येतो. लोखंडी असल्याने कीमान १५ वर्षे टिकेल.
७)कीडीचे पतंग विद्युत बल्ब/कंदील वर आदळून तोल जावून खाली असलेल्या राँकेल,कीटकनाशक मिश्रित पाण्यात पडून मोठ्या प्रमाणात मरतात.त्यामुळे कीडींची उत्पत्ती थांबते.
८)होणारे नुकसान टाळून रासायनिक कीटकनाशकावरील खर्च कमी होते. उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविता येते. (सदर प्रकश सापळा देवरी येथिल लक्ष्मी फँब्रिकेशन देवरी जि.गोंदिया मो.नं.९४२२७३३६४५ महाराष्ट्र बँकेसमोर,चिचगड रोड देवरी यानी बनवलेला आहे… ऑर्डर देऊन बनवून घेता येईल.)

प्रकाश सापळा लावण्यात आलेले शेतकर्याचे नावहेमंत परशराम बागडेरीया मो.नं. ७५०७३२७१२५
गावाचे नावकवलेवाडा (उन्हाळी भात,रब्बीहरभरा)ता.देवरी जि.गोंदिया..

Print Friendly, PDF & Email
Share