शिक्षक मतदारसंघांत मतदारांची संख्या साडेचार हजारांनी वाढली, येत्या ३० जानेवारीला मतदान
नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या ३० जानेवारीला मतदान होईल. यंदा जवळपास साडेचार हजारांची वाढ मतदारांच्या संख्येत झाली आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मागील निवडणुकीत ३५,००९ मतदार होते. यावर्षी ३९,४०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहिता राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिक्षक सेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी जाहीर केले.
भाजपकडून माजी आमदार नागोराव गाणार यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. भाजपने प्रथमच शिक्षक आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उतरवण्याचे ठरवले आहे, असे मराठवाडा येथील उमेदवार घोषित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले होते. या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर होणार आहे.
उमेदवारी अर्ज ५ जानेवारी पासून दाखल करता येईल. १२ जानेवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. १३ ला अर्ज छाननी होणार असून, १६ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे आता काँग्रेसने शिक्षक भारतीला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे.