अधिवेशनात भंडारा जिल्ह्याला भोपळा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
भंडारा : नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात भंडारा जिल्ह्याला भोपळा मिळाला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे केली.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने शब्दफेक आणि आकडेफेक करीत जनतेची धूळफेक केली. महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना सातशे रुपयांचा बोनस दिला होता. परंतु, आता हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने निम्मा बोनसची घोषणा करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कोणताही नवीन उद्योग जिल्ह्याला मिळाला नाही.
कोणतीही भरीव मदत दिली नाही. शेतकरी आणि जनतेवर झालेल्या अन्यायाचा बदला आता जनता घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. समृद्धी महामार्गावर बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने तयार केलेला समृद्धी महामार्ग हा श्रीमंत लोकांसाठीच तयार करण्यात आला आहे. या मार्गावर गरीबांची वाहने चालूच शकत नाही. अलीकडे या मार्गावर घडत असलेल्या अपघातांमुळे हे पुढे आले आहे.
समृद्धी महामार्गाची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय वाहनांऐवजी बिल्डरांच्या मोठ्या वाहनांचा वापर केला. समृद्धी महामार्गाऐवजी जुन्याच राष्ट्रीय महामार्गाचे अपग्रेडेशन करायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.