खत दरवाढीचा शेतकर्‍यांना ‘शॉक’

गोंदियाः रब्बी हंगामात केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्यामुळे शेतकर्‍यांचे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे. आधीच अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे शेतकरी संकटात असताना आता त्यांना केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ करुन ‘शॉक’ दिला आहे.

मागील वर्षभरात खते उत्पादक कंपन्यांनी केलेल्या दवाढीने खतांचे दर दुपटीने वाढले आहे. या गंभीर प्रकाराकडे केद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांनी हरभरा, वटाणा, तूर, पोपट, उडीद, मोहरीसह इतर कडधान्य व भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. पिके वाढीला लागल्यामुळे आता खताच्या दुसर्‍या डोसची गरज आहे. ऐन मोसमात डीएपी वगळता सर्व खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. 50 किलोच्या गोणीची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. एकरी साधारणतः दोन्ही डोस मिळून पीक काढणीपर्यंत दोन-तीन प्रकारची खते टाकावी लागतो. त्यामुळे वर्षभरापूर्वी रब्बी पिकांसाठी येणारा एकरी खर्च 6 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपयांवर गेला आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे शेती कशी कसायची? असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.

थंडीचा पिकांवर परिणाम

कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिकावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसात विदर्भात सर्वात थंड वातावरण जिल्ह्यात नोंदविले गेले आहे. त्यामुळे साधारणपणे पीक लागवडीनंतर 2 ते 3 खत फवारणीवर होणारे काम हवामान बदलामुळे आता 5 ते 6 फवारणीवर आले आहे. योग्यवेळी व प्रमाणात खत फवारणी न झाल्यास पीके हातून जाण्याची भीती, तर खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे फवारणी कशी करावी, अशी चिंता शेतकर्‍यांसमोर आहे.

Print Friendly, PDF & Email
Share