अखेर दारुडा शिक्षक निलंबित

गोंदिया ◼️मद्यधुंद अवस्थेत वर्ग खोलीतच पडून असलेल्या दारुड्या शिक्षकावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कारवाई करीत तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. सदर प्रकार गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या निंबा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत 22 डिसेंबर रोजी उघडकीस आला होता. घनश्याम मरसकोल्हे असे निलंबित दारुड्या शिक्षकाचे नाव आहे.तिल्ली मोहगाव केंद्रातील निंबा येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक पदावर घनश्याम रतिराम मरस्कोल्हे कार्यरत आहेत. शिक्षक घनश्याम मरस्कोल्हे हे 22 डिसेंबरला शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गखोलीत मद्यप्राशन करून आले. त्यांची अवस्था पाहून विद्यार्थी घाबरले दरम्यान ते वर्ग खोलीतच झोपी गेले. या प्रकाराची माहिती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली. हा सर्व प्रकार सामाजिक माध्यमांवर सामायिक झाला. शिक्षकाच्या या कृत्याचे सर्व स्तरावरून निषेध करून कारवाईची मागणी करण्यात आली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांनी याप्रकरणी चौकशीचे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना दिले. गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिरसाठ यांनी चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. शिक्षिकी पेशाला अशोभनीय कृत्य केल्याचे चौकशीत दिसून येताच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा तरतुदीनुसार शिक्षक घनश्याम मरस्कोल्हे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे नमूद करून त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Share