समग्र शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांना दिलासा

गोंदिया : समग्र शिक्षा अंतर्गत गत दोन दशकांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या मानधनात गत पाच वर्षापासून कोणतीही वाढ झाली नव्हती. कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व आंदोलन करून शासन दरबारी मांडल्या. या लढ्याला यश आले आहे. बुधवार 14 डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत समग्र शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने गोंदिया जिल्ह्यातील 148 तर राज्यातील सुमारे 5500 कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

शिक्षणापासून वंचित असणार्‍या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करुन शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबर गरजांमध्येही सुधारणा करण्यात समग्र शिक्षा हा केन्द्र व राज्य शासनाचा संयुक्त कार्यक्रम सुरू आहे. या कर्मचार्‍याद्वारे विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. जिल्ह्यात 148 कंत्राटी कर्मचारी आहेत. मागील 20 वर्षांपासून दरमाह एकत्रित अल्पशः मानधनावर हे कर्मचारी राबताहेत. यांना शासनाच्या कोणत्याही सोयी-सुवाधा नाहित. विशेष म्हणजे यांचा भविष्य निर्वाह निधीही कपात होत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने या कर्मचार्‍यांचा विमाही नाही. दरवर्षी या कर्मचार्‍यांच्या मानधनात 8 टक्के वाढ होणे अपेक्षित असताना गत 5 वर्षापासून कोणतीही वाढ झालेली नव्हती. मानधन वाढीसंदर्भात अनेकदा कर्मचार्‍यांनी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्री ते मंत्रालयात प्रत्यक्ष चर्चा केली, निवेदने दिलीत, मात्र यांच्या मानधन वाढीचा तिढा कायम होता. आज मुंबई येथील बैठकीमध्ये शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी संबंधीत अधिकार्‍यांशी चर्चा करून 10 टक्के मानधनात वाढ करवून दिली. याचा गोंदिया जिल्ह्यात कार्यरत 148 कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share